पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावसाहेब दिसतात. पुढल्या चित्रात मला काळा डगला चढवलेले श्रीरामपूरचे वकील रावसाहेब दिसतात; नंतर 'रयत'चे चेअरमन दिसतात. मन:पटलावरची चित्रे पुढे सरकत असतात. पुढच्या एका चित्रात त्यांची श्रीरामपूरपासून सिंगापूरपर्यंत विखुरलेली कर्तृत्ववान मुले दिसतात. त्याच्या पुढच्या चित्रात जपानपासून कॅनडापर्यंत पसरलेली उच्चविद्याविभूषित नातवंडे दिसतात. मग पुढच्या एका चित्रात त्यांचा ऑस्ट्रेलियातला छोटासा पणतूही दिसू लागतो - टिपटॉप कपडे करून डे केअर सेंटरमधे ड्रॉप केले जायची वाट पाहणारा. किंवा आफ्रिकेतल्या काँगोमधली तान्ही पणती - कामावरून आई कधी घरी परतेल याची वाट पाहणारी. आणि हा सगळा प्रदीर्घ प्रवास एकाच आयुष्यकाळात झाला आहे, ही कल्पना मला खूप रोमांचक वाटते. काळाच्या ओघात आपल्यापैकी अनेकांच्या वाट्याला असाच काहीसा प्रवास येणार आहे. अंतरे कमी-जास्त असू शकतील, पण प्रवासाचे एकूण स्वरूप हे इतकेच विस्मयकारक असणार आहे. परंपरेतून नवतेकडे जाणारा हा प्रवास आहे. नैतिक मूल्ये आणि विधायक कृतिशीलता यांची साथ घेऊनच आपल्याला नवतेच्या अल्पपरिचित प्रदेशात जायचे आहे. हे दोन्ही विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या सुसंस्कृतपणाचेच दोन अविभाज्य घटक आहेत. आपल्या सगळ्यांनाच या आपापल्या जीवनप्रवासात उपयुक्त ठरतील अशा अनुभवांची शिदोरी रावसाहेबांच्या समृद्ध अनुभवविश्वात आहे. वळणावळणाची व चढावाची वाट तुडवत आज रावसाहेब खूप लांबवर आले आहेत. इथून त्यांना होणारे विहंगम जीवन दर्शन आजच्या वाचकाला खूप उद्बोधक ठरेल. या विश्वासामुळेच रावसाहेबांची ही चरित्रगाथा वाचकांपुढे इतक्या विस्ताराने ठेवण्याचा हा खटाटोप केला आहे. ■ - अजुनी चालतोची वाट... ४४०