पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आयुष्यात पुन्हा एकदा ताठ उभे राहू शकले; जुने पराभव आणि जुन्या जखमा कुरवाळत बसले नाहीत. भ्रमनिरास झालेली माणसे खूपदा कटुवृत्तीची व तुच्छतावादी (सिनिकल) बनतात; रावसाहेब मात्र सतत चांगले आहे त्यावरच भर देत राहिले. रयतच्या चेअरमनपदी झालेली फेरनियुक्ती रावसाहेबांनी उतारवयातही का स्वीकारली असेल याच्या काही कारणांचा ऊहापोह या प्रकरणात पूर्वी झालेलाच आहे; पण रावसाहेबांची कृतिशीलता हेही त्यामागचे एक कारण असू शकेल. कुठल्याही प्रकारच्या व्यक्तिगत लाभाच्या अपेक्षेपेक्षा एखाद्या मोठ्या संस्थेचे प्रमुखपद क्रियाशीलतेला अधिक वाव देणारे व म्हणून अधिक पूरक ठरू शकते ही अनुभवसिद्ध जाणीव त्यामागे असावी. व्यक्तिगत पातळीवरही आपण बरेच काही चांगले काम करू शकतो यात शंकाच नाही; पण संस्थात्मक पातळीवर त्या कामाची व्याप्ती खूपच वाढते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आमटे परिवाराने उभारलेले आनंदवन, त्यांची आनंदवन येथील श्रमसंस्कार शिबिरे, शिवशंकरभाऊ पाटील यांनी शेगाव येथे गजाननमहाराज संस्थानामार्फत उभारलेले कार्य आणि अड्याळ टेकडीचे गीताचार्य तुकारामदादा यांचे ग्रामसभांचे कार्य या सर्व ठिकाणी असलेला रयत शिक्षण संस्थेचे अध्यापक व विद्यार्थी यांचा अभूतपूर्व सहभाग. या सर्व ठिकाणांपासून स्वतः रावसाहेबांनी तर खूप प्रेरणा घेतलीच, पण रावसाहेबांमुळे रयतशी निगडित अशी काही हजार माणसे या ठिकाणी भेट देऊन आली आणि त्या सगळ्यांच्याच दृष्टीने या भेटी आयुष्यात महत्त्वाचे असे काही मिळवून देणाऱ्या ठरल्या. रावसाहेब रयतमध्ये अधिकारपदी होते म्हणूनच केवळ त्यांना हे सारे जुळवून आणता आले; स्वत:ला आलेला अनुभव इतर अनेकांनाही देणे शक्य झाले. असेच दुसरे एक अगदी अलीकडचे उदाहरण जळगाव येथील सुप्रसिद्ध उद्योगपती भंवरलालजी जैन यांनी स्थापन केलेल्या महात्मा गांधी प्रतिष्ठानच्या संदर्भातले देता येईल. गांधीविचार शाळकरी मुलांमध्ये रुजावेत या दृष्टीने गांधीविचारांवर अधिष्ठित अशी एक परीक्षा प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक अशा काही पुस्तिकाही प्रत्येक परीक्षार्थीला दिल्या जातात व त्या कायमच्याच परीक्षार्थीच्या संग्रही राहतात; त्या प्रमाणात गांधीजींचे विचार त्यांच्यापर्यंत पोचायला मदत होते. प्रतिष्ठानच्या कामाने रावसाहेब स्वतः तर प्रभावित झालेच; पण आपले हे प्रेरणास्थान विद्यार्थ्यांपर्यंतही पोचावे या दृष्टीने त्यांनी रयतचे विद्यार्थीही या परीक्षेला बसतील अशी योजना कार्यान्वित केली. या परीक्षेला यंदा रयतचे त्रेचाळीस हजार विद्यार्थी बसले व ही संख्या उत्तरोत्तर वाढत जाऊन लाखाच्या वर पोहोचेल असा रावसाहेबांना विश्वास वाटतो. हाती एखादी संस्था असली की अजुनी चालतोची वाट... ४३६