पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ख्रिश्चन मिशनची अनेक कायदेशीर कामे त्यांनी एक वकील म्हणून वर्षानुवर्षे विनामूल्य करून दिली आणि १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये हिंसक दंगेखोर जमावाला काबूत आणण्याकरिता ते स्वतः जीव धोक्यात घालून रस्त्यात उतरले. भ्रष्टाचाराविरुद्ध ते नुसतीच ओरड करत बसले नाहीत. रयतमध्ये दर दोन वर्षांनी होणारी शिक्षकभरती एक पैसाही खाल्ला न जाता व्हावी यासाठी त्यांनी एक इंटरनेटवर घेतली जाणारी परीक्षापद्धती व पारदर्शी निवडप्रक्रिया MKCL संस्थेच्या मदतीने जारी केली. विविध ठिकाणी व्याख्याने देण्यासाठी ते शेकडो मैलांचा प्रवास करत असतात. तो सर्व खर्च ते स्वतः करतात. आपल्या लेखनाचे व व्याख्यानाचे ते कधी मानधनही घेत नाहीत. मूळ ऐंशी एकर असलेली त्यांची जमीन आता फक्त दहा एकर उरली आहे, याची त्यांना जराही खंत नाही. त्यांच्या कृतिशीलतेचा एक आगळा भाग म्हणजे केवळ स्वत:च्याच पुढाकारातून सुरू होणाऱ्या कामात ते सहभागी होतात असे नव्हे; दुसरा कोणी एखादे चांगले काम करत असेल, तरी त्याला ते सर्वतोपरी मदत करतात - मग त्यामुळे दुसऱ्याचे काम अधिक मोठे होणार असेल तरी त्यांना फिकीर नसते. फक्त कोरडी स्तुती ते करणार नाहीत, तर स्वतःच्या खिशातही हात घालतील, चारचौघांकडे शब्द टाकतील, त्या कामासाठी स्वत:चे 'कॉन्टक्ट्स' मोकळेपणे वापरतील. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दिनिमित्त २०१३-१४ सालात त्यांच्या जीवनावर शंभर व्याख्याने द्यायचा संकल्प सोडला, तेव्हा रावसाहेबांनी आपणहूनच त्यांची आठ-दहा व्याख्याने आयोजित केली; तीही हजारो विद्यार्थ्यांसमोर. तोही चारित्र्यसंवर्धनाचाच एक भाग होता. आनंदवन निर्मित स्वरानंद ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम त्यांनी फक्त स्वतःच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपुरात आयोजित नाही; संगमनेर, कोपरगाव, अकोले इथेही तो आयोजित करवला व त्यातून भरपूर निधीही गोळा करून दिला. अशा उपक्रमांत त्यांची कुठल्याही स्वरूपातील परतफेडीची तर सोडाच पण अगदी कृतज्ञतेची ही अपेक्षा नसते. आपापल्या अंगीकृत कार्यासाठी अनेक जण कष्ट उपसतात; पण दुसऱ्या कोणाच्या उपक्रमातही असा सक्रिय भाग घ्यायचा दिलदारपणा आज अगदी क्वचितच कुठे आढळतो. विचार आणि वर्तन यांच्यातला हा मेळ, ही स्वार्थरहित कृतिशीलता आज खूपच दुर्मिळ आहे. रावसाहेबांच्या नैतिकतेच्या आग्रहाला ही कृतीचीही जोड दिलेली असते. "The purpose of education is right action” या प्लेटोच्या वचनाचे रावसाहेब हे मूर्तिमंत रूप आहेत. या कृतिशीलतेमुळेच साम्यवादापासून झालेल्या भ्रमनिरासानंतर रावसाहेब अजुनी चालतोची वाट... ४३५