पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणूस बदलल्याशिवाय कुठलीच सिस्टिम नीट चालू शकणार नाही व म्हणून जगही बदलणार नाही; माणूस बदलणे सर्वांत महत्त्वाचे, यावर त्यांचा पूर्ण विश्वास बसला आहे. मार्क्स ते गांधी प्रवास तो हाच. 'व्यवस्था बदलायलाच हवी, ते आवश्यकच आहे; पण माणूसही आधी बदलायला हवा' हा एक अतिशय कालसुसंगत असा विचार आहे. 'Nothing is stonger than an idea whose time has come' ('ज्याची वेळ आली आहे अशा विचारापेक्षा अधिक बलवान जगात काहीही नसते') असे विख्यात फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्युगो यांनी लिहिले आहे. कर्मवीरांच्या काळात शिक्षणाशिवाय विकास होणार नाही हा असाच एक युगधर्म मानला जावा असा विचार होता. व्यक्तिगत नैतिक परिवर्तनाची अपरिहार्यता हा असाच एक आजचा विचार आहे. मनुष्यस्वभावाची तशी त्यांना चांगली पारख आहे आणि माणसाची स्खलनशीलताही त्यांनी खूप अनुभवलेली आहे; पण तरीही त्यांनी मूल्यांचा ध्यास कधी सोडलेला नाही; 'निर्मळ गंगेत मगरी असतील, तर चिखलातही कमळे फुलतील' या उक्तीवरचा विश्वास कधी ढळू दिलेला नाही. नैतिक मूल्यांच्या आग्रहाप्रमाणेच रावसाहेबांचा मला भावणारा दुसरा विशेष म्हणजे या आग्रहाला त्यांनी दिलेली विधायक कृतिशीलतेची जोड. इथेही पुन्हा आपण गांधीजींपाशी येतो. गांधीजींचा जगावर इतका प्रभाव कशामुळे पडला याचे विश्लेषण करताना त्यांचे अमेरिकन चरित्रकार लुई फिशर यांनी म्हटले आहे, ‘His magic lies in his action.' (त्यांची जादू त्यांच्या कृतीत सामावलेली होती.) आपली मूल्येही आपल्या जगण्यातून प्रतीत व्हायला हवीत असे रावसाहेबांना वाटते व 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' या समर्थउक्तीनुसारच ते जगत आले आहेत. अगदी हायस्कूलमध्ये शिकत असताना देखील वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी संगमनेरला चाळीस विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले होते. मुक्ता तेली, शंकर न्हावी, बन्सी बुरूड अशा विभिन्न जातींच्या गावकऱ्यांचा राबता असलेल्या घरात ते वाढले असले; 'आमच्यातला सर्वात जास्त ब्राह्मणाळलेला माणूस' असा त्यांचा उल्लेख एकदा मराठा समाजातून आलेल्या एका ज्येष्ठ मंत्र्याने जाहीर व्यासपीठावरून केलेला असला, तरी रावसाहेबांच्या जातिधर्मनिरपेक्षतेचा तो केवळ एक भाग आहे - त्याहूनही महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे त्यांनी केलेली प्रत्यक्ष कृती. केवळ एक मूल्य म्हणून वैचारिक पातळीवर ते धर्मनिरपेक्षता स्वीकारत नाहीत; प्रत्यक्ष जीवनातही तसेच वागतात. म्हणूनच श्रीरामपूरच्या - अजुनी चालतोची वाट... ४३४