पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिस्सा दान करून पुण्य मिळवायचा किंवा आपल्या सदसद्विवेकाची टोचणी कमी करायचा प्रयत्न करतात. 'सौ चूहे खा के बिल्ली चली हाज को' असा काहीसा तो प्रकार असतो. रावसाहेबांनी मात्र श्रीरामपूर कोर्टातील निम्याहून अधिक केसेस स्वत:कडे असतानाही अवाजवी पैसे कधी लावले नाहीत. जेव्हा मोठेमोठे खटले जिंकले तेव्हासुद्धा टक्केवारीच्या हिशेबात आपली फी वाढवली नाही. पैसा जरूर कमावला, पण सर्वसाधारण उच्च मध्यमवर्गीय आयुष्य जगता येईल इतपतच. आपल्या अशिलांनाही त्यांनी खूप आपुलकीने आणि सन्मानाने वागवले. अनेक गरिबांच्या केसेस अगदी फुकटात लढवल्या; मुख्य म्हणजे त्यांना कधीही हिडीसफिडीस केले नाही. म्हणूनच बडे बागायतदार वा कारखानदार आणि सर्वसामान्य भरडला जाणारा शेतकरी हे दोघेही कोर्टात लवाद म्हणून त्यांचे नाव लगेच स्वीकारत. ज्या तत्त्वनिष्ठेने रावसाहेबांनी आपला वकिली व्यवसाय केला ती तत्त्वनिष्ठाही केवळ अन्य वकिलांसाठीच नव्हे, तर अन्य कुठल्याही क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी आदर्श ठरावी अशीच होती. जायच्या दोन-चार दिवस आधी त्यांचे वडील रावसाहेब आणि अण्णासाहेब यांना म्हणाले होते, “तुम्ही मोठे झालात याचं मला समाधान आहेच, पण तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागता याचं समाधान अधिक आहे. तुमच्यात माणुसकी आहे ती सोडू नका, आल्या गेल्याचा असाच मानपान करत राहा. तुमच्या पैशापेक्षा तुमच्या वागणुकीचा मला जास्त अभिमान वाटतो." वडलांचे हे उद्गार ऐकून दोन्ही मुलांना अगदी भरून पावल्यासारखे वाटले होते. स्त्रियांबद्दलची आदरभावना, त्यांना सतत बरोबरीचे स्थान देण्यातले पुरोगामित्व व कुटुंबवत्सलता हे गुण म्हणजे रावसाहेबांच्या सुसंस्कृततेचा एक खूप लोभस असा भाग आहे. पत्रांमध्ये किंवा भेटींमध्ये घरच्या मंडळींची चौकशी केल्याशिवाय ते राहत नाहीत. गांधीजींनी सांगितलेल्या सात महत्पापांमध्ये 'तत्त्वशून्य राजकारण' (Politics without Principle) हे एक आहे, याचा ते नेहमी उल्लेख करतात. 'सहकाराला सदाचारांची जोड हवीच' हाही त्यांचा आग्रह असतो. शेवटी माणूस बदलला पाहिजे, त्याशिवाय कुठलीही 'सिस्टीम' यशस्वी ठरणार नाही, यावर त्यांची आता अढळ श्रद्धा बसली आहे. एकेकाळी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली असताना, सिस्टिम बदलली की माणूस आपोआपच बदलेल यावर रावसाहेबांची श्रद्धा होती. पण आता मात्र अजुनी चालतोची वाट... ४३३