पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होते आणि स्वत:लाही आदर्श, सुसंस्कृत बनवण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. लहानपणापासूनच ते स्वत:ला 'घडवायचा' जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते असे त्यांच्या सविता भावे व बी. जी. बंगाळ यांच्यासारख्या जुन्या मित्रांचेही निरीक्षण आहे. त्यासाठी त्यांनी वाचनवेड जोपासले. त्यातही त्यांना मनावर चांगले संस्कार करू शकणारी पुस्तकेच आवडत गेली; त्यांचा मूळ पिंडच तो होता. म्हणूनच त्यांना 'रणांगण' पेक्षा 'श्यामची आई' आवडली; ना. सी. फडकेंपेक्षा वि. स. खांडेकर रुचले; मर्ढेकरांपेक्षा कुसुमाग्रज भावले. 'कलेसाठी कला' ही भूमिका त्यांना कधीच पटली नाही. त्यांनी खूप मित्र जोडले; पण भ्रष्ट, व्यसनी, आपमतलबी, ढोंगी माणसांपासून स्वत:ला दूरच ठेवले. खूप प्रवास केला; दर मोठ्या सुट्टीत ते सहकुटुंब बाहेर पडत. पण तेव्हाही फाइव्ह स्टार शानषौकीवर पैसे उधळण्यापेक्षा देश पाहण्यावर, आपला ऐतिहासिक वारसा समजून घेण्यावर, आनंदाचे क्षण कुटुंबासह एकत्र अनुभवण्यावर त्यांनी भर दिला. त्यांचा नैतिकतेचा आग्रह केवळ वैचारिक पातळीवरचा नव्हता; स्वत:च्या जगण्यातही त्यांनी तो धरला. अनेक प्रकारचे मोह त्यांनी हेतुतः टाळले. निरलस सेवाभाव जोपासला. त्यांनी ना कधी बालपणाच्या हालअपेष्टांचे भांडवल केले, ना कधी मागासलेल्या ग्रामीण वा आदिवासी जीवनाचे उदात्तीकरण केले. परंपरेतले जे चांगले होते ते ठेवले; पण आधुनिकतेची कास आणि विकाससन्मुख भूमिका कधी सोडली नाही. वडील बंधूंची गरज अधिक आहे हे लक्षात येताच वारसाहक्काने स्वत:च्या वाट्याला आलेली जमीन रावसाहेबांनी राजीखुषीने त्यांना देऊन टाकली. शेतकरी कुटुंबातील माणसांना आपली जमीन किती प्राणप्रिय असते आणि कोर्टात वर्षानुवर्षे चालू असलेले बरेचसे खटले हे भावाभावांमधल्या जमिनीच्या वाटणीवरून असतात हे ज्यांना ठाऊक आहे त्यांनाच रावसाहेबांच्या या त्यागाचे आगळेपण समजू शकेल. आणि इतके करूनही स्वतःच्या आईवडलांचा सांभाळ मात्र त्यांनी स्वतःच शेवटच्या दिवसापर्यंत आणि खूप प्रेमाने केला. आईवडलांची जबाबदारी सर्व भावंडांनी वाटून घ्यावी किंवा ज्यांना वडिलोपार्जित प्रॉपर्टी जास्त मिळाली त्यांनी अधिक घ्यावी, असा व्यावहारिक प्रस्ताव मांडायचे त्यांच्या कधी मनातही आले नाही. एरवी आईवडलांवर भरभरून बोलणारे किती जण प्रत्यक्ष जीवनात स्वतःच्या आईवडलांसाठी अशा खस्ता खातील ? हीच नीतिमत्ता रावसाहेबांनी आपल्या वकिली व्यवसायातही सांभाळली. खूप जण आपल्या व्यवसायामध्ये भरपूर पैसे कमावतात किंवा 'आमच्या श्रमाची व वेळेची ही किंमत अगदी वाजवीच आहे,' असे स्वतःच स्वतःला पटवून देत भरमसाट फी आकारतात आणि मग आयुष्यात पुढे त्याच संपत्तीतील थोडासा अजुनी चालतोची वाट... ४३२