पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभ्यासाला सोयीची जागा आणि वातावरण नव्हतेच. इंग्रजी बाराखडी आणि शब्दांचे स्पेलिंग पाठ करता करता त्यांची एकाग्रताही वाढली. तर्खडकरांच्या भाषांतरपाठमालेमुळे व्याकरण व वाक्यरचना सगळेच जमायला लागले. त्यांची निराशा दूर पळाली. हळूहळू आत्मविश्वास वाढू लागला. भाषांतरपाठमाला त्यांची दोस्त बनली आणि गोंदेश्वराचे देऊळ ही शाळा. बघता बघता त्यांना उत्तम इंग्रजी येऊ लागले. जुलैच्या अखेरीस झालेल्या मासिक परीक्षेत त्यांना बाकी विषयांत चांगले मार्क होते, पण इंग्रजीत ते नापास झाले होते; पण पुढे ऑगस्टच्या मासिक परीक्षेत इंग्रजीसह सर्वच विषयांत ते पहिले आले. पुढे प्रत्येक मासिक परीक्षेत त्यांनी हा पहिला क्रमांक सोडला नाही. इंग्रजीवरील या प्रभुत्वाचे रावसाहेबांच्या जीवनात खूप महत्त्व होते. यापूर्वीही स्कॉलरशिपच्या परीक्षेत त्यांनी उत्तम यश मिळवले होते, पण त्या यशात तोरकडी मास्तरांचाही मोठा वाटा होता. आताचे यश मात्र केवळ त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांतून मिळाले होते; एकलव्याप्रमाणे त्यांनी एकट्यानेच इंग्रजीची साधना केली होती. इंग्रजीच्या सरांनी केलेल्या मानहानीचाही यात त्यांनी बदला घेतला होता; झालेल्या अपमानाला प्रत्यक्ष कृतीतून सडेतोड आणि समर्पक उत्तर दिले होते. इंग्रजी ही त्यावेळी राज्यकर्त्यांचीच भाषा होती; ती चांगल्याप्रकारे येणे ही समाजात खूप मानाची बाब मानली जायची. या अनुभवाने रावसाहेबांचा आत्मविश्वास दुणावला; 'अशक्य ते साध्य, करिता सायास' या संतवचनातली यथार्थता पटली. या यशाची तुलना काही वर्षांपूर्वी बंधू अण्णासाहेबांनी संस्कृतमध्ये मिळवलेल्या प्रावीण्याबरोबरच कदाचित करता येईल. कोल्हेवाडीच्या शाळेत अण्णासाहेब शिकत तानाची ती गोष्ट. एक दिवस अण्णासाहेबांची संस्कृतच्या उच्चारात काही चूक झाली म्हणून शिक्षकांनी त्यांचा कान पकडून जोरात पिळला. इतका, की त्यांच्या डोळ्यांतून पाणीच आले. तेवढ्यावरच शिक्षक थांबले नाहीत, तर मोठ्याने ओरडून म्हणाले, "अरे माठ्या, नांगर हाकायचा सोडून तू इकडे कुठे आलास?" अण्णासाहेबांना हा अपमान अतिशय झोंबला होता. त्यांनी जिद्दीने संस्कृतचा अभ्यास केला. एक-दोन वर्षांत संस्कृतमध्ये त्यांचा पहिला नंबर येऊ लागला. पुढे पेटिट हायस्कूलमधून ते पहिल्या क्रमांकाने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि विशेष म्हणजे संस्कृतमध्ये त्यांनी शंभरात नव्याण्णव गुण मिळवले. त्यांचे उच्चार तर इतके सुधारले, की पुढे आयुष्यात एक अस्खलित वक्ता म्हणून त्यांनी यश मिळवले. त्या यशात त्यांच्या अजुनी चालतोची वाट... ४२