पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्थाने पुढच्या पिढीचे प्रतिनिधीं. ते लिहितात : "मी रावसाहेबांना मिस्किलपणे एक प्रश्न विचारला, 'रावसाहेब, तुमच्याबद्दल तुमच्या एका स्नेह्यांनी असं लिहिलंय की, आयुष्यात मशाल होऊन पेटेल असं वाटलं होतं, पण हा माणूस पणती होऊन स्निग्ध जळत राहिला. या वाक्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?' रावसाहेबच काय, पण क्षणभर सारेच स्तब्ध झाले ! आणि मग रावसाहेबांनी सहचरीच्या आणि जिवलग मित्रांच्या साक्षीने स्वत:च्या आयुष्याचा आढावाच घेतला. भौतिक अर्थाने 'गाजणाया' पद्धतीचं आयुष्य त्यांनी का नाही स्वीकारलं, याचं उत्तर रावसाहेबांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांमध्ये दडलेलं आहे. प्रत्येक निर्णय त्यांनी वास्तवतेच्या कसोटीवर घासूनच घेतलेला आहे. भावनेच्या किंवा मोठेपणाच्या भरात वाहून जाण्याचा मोह त्यांनी नेहमीच टाळला आहे. म्हणूनच असं वाटतं की या आयुष्याची मशाल झाली असती, तर समाजाला नक्कीच उपयोग झाला असता, पण स्निग्ध प्रकाश देणारी पणती झाल्यामुळे समाजाला जे मिळालं आहे, जे मिळतं आहे, त्याचं मूल्य काही वेगळंच आहे." कार्ल मार्क्सपासून वयाच्या चौदा-पंधराव्या वर्षी सुरू झालेला रावसाहेबांचा विचारप्रवास आता वयाच्या शाऐंशीव्या वर्षी महात्मा गांधींपर्यंत येऊन पोहोचला आहे. चरख्याची व सूतकताईची एकेकाळी साम्यवादी टर उडवत असत, पण गेली अनेक दशके रावसाहेब फक्त खादीचे कपडे वापरत आहेत हेही इथे नोंदवायला हवे. या प्रदीर्घ प्रवासात खूप काही गोष्टी बदलल्या; बदलल्या नाहीत त्या दोन गोष्टी. रावसाहेबांचा नैतिकतेचा आग्रह आणि त्यांची विधायक कृतिशीलता. आणि या दोन्ही गोष्टी त्यांना गांधीजींशी जोडणाऱ्या आहेत. आपले वेगवेगळे सामाजिक प्रश्न अणि खास करून त्यांचा शिक्षणक्षेत्राशी असलेला संबंध याविषयी रावसाहेब खूपदा बोलत असतात. ऑक्टोबर २००९ मध्ये अंतर्नाद मासिकाने 'शरद जोशी विशेषांक' प्रकाशित केला होता. पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात २५ सप्टेंबरला अंकाचा प्रकाशन समारंभ झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात रावसाहेब म्हणाले होते, "एकेकाळी या देशात कृषिसंस्कृती होती. ती केव्हाच मागे पडली असून आज आपण देशात पगारदार संस्कृती निर्माण केली आहे. कुठल्याही शेतकऱ्याच्या मुलाला आज शेती करण्यात रुची उरलेली नाही. स्वत:च्या शेतात उभं राहून घाम गाळायची त्याची तयारी नाही. त्याला पंख्याखाली बसायची नोकरी करायची आहे अजुनी चालतोची वाट... ४२९