पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मजल दरमजल करीत राहील यात शंका नाही." यानंतर वीस वर्षांनी रावसाहेबांच्या वयाला ऐंशी वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्ररेणापर्व या नावाने पुन्हा एक गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. त्यातही पुन्हा सविता भावे यांचा एक लेख वाचायला मिळाला. 'आहे याहूनही मोठा' या शीर्षकाचा. त्यात ते म्हणतात : " अजूनही मला असे कायम वाटत राहिले आहे, की रावसाहेबाच्या ठायी मूलभूत गुणवत्ता होती, असामान्य कर्तृत्वशक्ती होती; तिचा पुरेपूर वापर झाला नाही. म्हणून मी पूर्वी एकदा त्याचा उल्लेख 'वाया गेलेला मित्र' असा केला होता. याला कारण निव्वळ परिस्थिती. मूळचा कडव्या डाव्या विचारसरणीचा रावसाहेब त्या चळवळीची येथे झालेली दुर्दशा पाहून हताश झाला. त्या अवस्थेवर मात करून साम्यवादी विचारसरणीला आपल्या परंपरेनुसार आवश्यक ते स्वरूप व वळण देण्याची क्षमता असलेल्या मोजक्या मंडळींत रावसाहेबाची गणना होती; पण त्यासाठी लागणारी उसंत मिळणे त्याला परिस्थितीच्या रेट्याखाली शक्य झाले नाही. तत्कालीन पुढारीपणामुळे त्याचा भ्रमनिरास झाला; तसेच त्या विरोधात उभे राहून चळवळीला आवश्यक ते वळण लावणेही त्याला शक्य झाले नाही. आजही बहुतेक जाणकार, विचारवंत मान्य करतात, की निष्ठावंत आणि चारित्र्यवान कार्यकर्ते कुठे असतील तर ते केवळ डाव्या चळवळीत. अशा चळवळीतील एकांगीपणा किंवा ठोकळेबाजपणा टाळून ती लोकाभिमुख करण्याची ताकद रावसाहेबाजवळ होती. आणि तो त्या मार्गावरून चालत राहू शकला असता, तर समविचारी शेकडो कार्यकर्ते त्याच्या भोवती गोळा झाले असते; पण महाराष्ट्राच्या भाळी ते भाग्य नव्हते. रावसाहेब सर्व दृष्टींनी मोठाच आहे; पण तो याहूनही मोठा होऊ शकला असता असे मला प्रांजळपणे वाटते." या दोन्ही लेखांमधे भावे यांनी रावसाहेबांचा असा गुणगौरव केलेला आहे; पण त्याचबरोबर आपल्या अपेक्षा पुन्य न झाल्याची खंतही ते व्यक्त करतात. दुसरा एक नोंद घेण्याजोगा मुद्दा म्हणजे, दोन्ही लेखांमधे तब्बल वीस वर्षांचे अंतर असूनसुद्धा लेखकाने केलेल्या जुन्या मित्राच्या मूल्यमापनामध्ये काहीच फरक पडलेला दिसत नाही; याचाच अर्थ हे लेखकाचे विचारान्ती बनलेले मत ( कन्सिडर्ड ओपिनियन) असावे. याच मताचा संदर्भ देत 'प्रेरणापर्व'मध्ये 'पणतीचे स्निग्ध आश्वासन' या शीर्षकाखाली किरण कुलकर्णी यांनी लिहिले आहे. सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. कुलकर्णी म्हणजे श्रीरामपूर येथील ग्रंथपाल व रावसाहेबांचे निकटचे स्नेही हरिभाऊ कुलकर्णी यांचे चिरंजीव. म्हणजे एका अजुनी चालतोची वाट... ४२८