पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रवृत्ती तशा परस्परपूरक आहेत. 'परित्राणाय साधूनाम्, विनाशाय च दुष्कृताम्' हे भगवद्गीतेतील देवाच्या अवतारामागचे कारण किंवा 'सद्रक्षणाय खलुनिर्दलनाय' हे पोलीस खात्याचे ब्रीद हे याच तत्त्वज्ञानाशी साधर्म्य सांगणारे आहे. पण एकूण आयुष्याचा विचार केला व रावसाहेबांचे संयमी, विवेकी, विचारी, मदतशील, ऋजू व्यक्तिमत्त्व बघितले, तर मूलतः रावसाहेबांचा पिंड हा अपोलोनियन आहे असे म्हणावेसे वाटते. रावसाहेबांनी समाजोपयोगी काम खूप केले पण त्यांनी स्वतःची कुवत असूनही समाजाला नेतृत्व मात्र दिले नाही, असे मत त्यांच्या काही हितचिंतकांनी व्यक्त केले आहे. रावसाहेबांच्या चरित्रात त्याही मताची दखल घेतली जावी असे वाटते. त्यांच्यापैकी एक आहेत प्रसिद्ध चरित्रलेखक आणि त्यांचे पुण्याच्या लॉ कॉलेजातील वर्गमित्र सविता रा. भावे. रावसाहेबांचा एकेरी उल्लेख करणारी त्यांच्या अवतीभवतीची ही बहुधा एकमेव व्यक्ती. रावसाहेबांच्या वयाला साठ वर्षे पुरी झाल्याबद्दल त्यांच्या काही सुहृदांनी जून १९८८ मध्ये 'गौरविका' या नावाचा एक गौरवग्रंथ प्रकाशित केला होता. तो वाचत असताना 'वाया गेलेला मित्र' या शीर्षकाच्या एका लेखाने माझे लक्ष वेधून घेतले. अशा शीर्षकाचा लेख गौरवग्रंथात असावा याचे आश्चर्यच वाटले. "या काळात रावसाहेब म्हणजे अक्षरश: धगधगीत असा स्फुल्लिंग होता" असे सुरुवातीलाच म्हणत त्या लेखात कॉलेजदिवसांपासूनच्या त्यांच्या मैत्रीचा आढावा घेतला होता. "त्याची लग्नपत्रिका माझ्या अक्षरात लिहिलेली आहे. आमचे येणेजाणे कायम राहिले, कौटुंबिक नातेच जडले. मोठेपणाला भावणारे सद्गुणही त्याच्यात फुलत गेले. मुळात तो भावुक, श्रद्धाळू, माणसे बरोबर घेऊन जाणारा" असे स्नेहाची साक्ष पटवणारे उल्लेखही लेखात बरेच आहेत. पण वेगळा सूर उमटवत शेवटच्या च्छेदात भावे म्हणतात :

"पण मी मात्र मनातून नेहमीच हळहळ करीत राहीन की ठिणगीतून मशाल पेटली नाही; तिची समई झाली. एक फार कर्तृत्वाचा माणूस वाया गेला; त्याच्या ठायी जी झेप होती तिला पुरे पडणारे क्षितिज त्याला लाभले नाही. आज जे त्याने कमविले आहे त्याच्यापेक्षा त्याची कुवत फार मोठी होती. अलीकडे नेते गणलेले कित्येक जण त्याच्या पासंगालाही पुरले नसते. बदलत्या परिस्थितीच्या रेट्याशी टक्कर द्यायला कदाचित त्याला खूप झुंजावे लागले असते; पण त्यासाठी जरूर ते आत्मिक बळ रावसाहेबाजवळ खचित होते. हे घडले नाही. त्याला थोडेफार आपण जबाबदार ही रुखरुख तर राहूनच जाणार. तरी पण साठ वर्षांत रावसाहेबाने जे केले आहे ते इतरांच्या दृष्टीने बरेच मोठे आहे. आणि त्याच वाटेवर तो पुढेही अजुनी चालतोची वाट... ४२७