पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ते किती महत्त्व देत होते हे दाखवणारे आहे. विचारांचा कैफ माणसांना कसा चढतो आणि त्यांची सारासार बुद्धी कशी भ्रष्ट करतो हे दाखवणारे रावसाहेबांचे अनेक अनुभव आहेत. उदाहरणार्थ, बेचाळीसच्या आंदोलनात त्यांनी संगमनेर - अकोले- सिन्नर परिसरात रस्ते उखडणे, नद्यांवरचे पूल पाडणे, विजेचे व टेलिग्राफचे खांब तोडणे असल्या प्रकारांत भाग घेतला होता. त्यावेळी त्यात खूप शौर्य आणि देशभक्ती आहे असेच वाटले होते. पण त्यामुळे इंग्रज राज्यकर्त्यांचे केसभरही काही वाकडे झाले नव्हते, उलट स्थानिक गावकऱ्यांचे मात्र या सुविधांच्या अभावी पुढले अनेक महिने प्रचंड हाल झाले होते. शिवाय त्यातून निर्माण मात्र काहीच झाले नाही ना कोणाला रोजगार मिळाला, ना कोणाची गरिबी हटली. म्हणूनच संघर्षपर्वातल्या ह्या आठवणी आज रावसाहेबांना क्लेशदायक वाटतात आणि म्हणूनच त्यांची नंतरची वाटचाल संघर्षाकडून विधायक कार्याकडे होत गेली. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात अपोलोनियन आणि डायोनिशियन (Apollonian and Dionysian) अशा दोन सकृतदर्शनी परस्परविरोधी पण प्रत्यक्षात परस्परपूरक प्रवृत्तींचा ऊहापोह केलेला आहे. ग्रीक पुराणांनुसार अपोलो हा प्रकाशाचा देव, तर डायोनिसस हा मद्य आणि संगीत यांचा देव. प्रत्यक्षात दोघेही सख्खे भाऊ व ऑलिंपस पर्वताचे (ज्याच्या नावाने ऑलिपिंक स्पर्धा भरतात) पुत्र. या दोन प्रवृत्तींमधील तणावातच मानवी जीवन आकार घेते असे मानले जाते. विख्यात जर्मन तत्त्वज्ञ फ्रेडरिक नित्चे (जर्मनमध्ये Friedrich Nietzsche) (१८४४ ते १९००) याचे तत्त्वज्ञान याच दोन प्रवृत्तींमध्ये समतोल असावा असे मांडणारे आहे. पुढे इतरही अनेक तत्त्वज्ञांनी या प्रवृत्तीबद्दल विवेचन केले आहे. सामान्यतः अपोलोनियन सारासार विचार करणारी, तर्कशुद्ध, बुद्धिनिष्ठ, कायदा आणि सुव्यवस्था पाळणारी व विधायक काम करणारी प्रवृत्ती मानली जाते; तर डायोनिशियन म्हणजे अतार्किक, भावनाशील, कायदा व सुव्यवस्था झुगारून देणारी, कलंदर आणि निषेध व संघर्षावर भर देणारी अशी मानली जाते. या मांडणीनुसार रावसाहेब आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मुख्यतः डायोनिशियन होते व नंतरच्या काळात ते मुख्यत: अपोलोनियन बनले असे मानता येईल. त्यांचा बेचाळीसच्या आंदोलनातला व कम्युनिस्ट चळवळीतला सहभाग किंवा सहकारी कारखान्यांतील भ्रष्टाचाराविरुद्धचा संघर्ष हा मुख्यत: डायोनिशियन प्रवृत्तीतून आलेला असावा; तर नंतरच्या काळातील शेती, दुग्धव्यवसाय, रयत शिक्षण संस्था यांच्यातील सहभाग हा अपोलोनियन प्रवृत्तीतून आलेला असावा. दोन्ही अजुनी चालतोची वाट... ४२६