पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वकील म्हणून अनेक कायद्यांमधील त्रुटी रावसाहेबांना जाणवतात. ते म्हणतात, "कूळकायदा, भाडे नियंत्रण कायदा, कमाल जमीन धारणा कायदा, कामगारांच्या व उद्योगधंद्यांच्या संबंधित कायदे, शिक्षणक्षेत्रासंबंधीचे कायदे अशा विविध कायद्यांचा कोर्टातील कामाच्या निमित्ताने आणि शिक्षणसंस्थांच्या कामाच्या निमित्ताने मला अभ्यास करावा लागला. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतानादेखील त्यांचे काय परिणाम होतात ते अनुभवायला मिळाले. कायद्याचा हेतू व आवश्यकता वादातीत आहे, तथापि सामाजिक न्यायाच्या नावाखाली त्यांच्यात खूपच एकांगीपणा आला आहे. केवळ अनिर्बंध हक्कांचीच राखण हे कायदे करतात; कर्तव्याचा भाग तिथे पूर्ण दुर्लक्षिला गेला आहे. कर्तव्यच्युती व बेजबाबदारपणा यांना प्रभावीरीत्या लगाम घालण्याच्या तरतुदी या कायद्यांमध्ये अजिबात दिसत नाहीत." असे कायदे बदलणे यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सरकारी हस्तक्षेप आवश्यकच आहे; केवळ तुम्ही आम्ही या बाबतीत काहीच करू शकणार नाही. इथेही पुन्हा आपण राजकीय नेते आणि सरकार व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी किती आवश्यक आहेत या मुद्दयाशी येतो. देशाच्या एकूण विकासाशी निगडित असाच हा प्रश्न आहे. असे असूनही रावसाहेब स्वतः मात्र कधी पक्षीय राजकारणात पडले नाहीत वा त्यांनी सत्तास्थानाची आस बाळगली नाही, हे नोंद घेण्याजोगे आहे. 68 रावसाहेबांनी श्रीरामपूरहून विधानसभेसाठी उभे राहावे म्हणून मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी खूप आग्रह केला होता. निवडणुकीनंतर मंत्री बनवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. पण रावसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना नकारच दिला. त्यांचे मन वळवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेबांना केली. पण त्या कामात अण्णासाहेबांनाही यश आले नाही. अण्णासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव अनिल शिंदे म्हणतात, 'आपल्या नकाराच्या समर्थनार्थ काकांनी दोन मुद्दे मांडले होते. एक म्हणजे, एकाच घरातील दोन व्यक्तींनी राजकारणात शिरणे हे लोकशाहीच्या दृष्टीने चुकीचे उदाहरण घातल्यासारखे होईल. आणि दुसरा मुद्दा म्हणजे, आपण दोघेही भाऊ एकाच परिसरातील राजकारणात राहिलो, तर आपल्या दोघांमधले सध्याचे प्रेमसंबंध सांभाळणे अवघड होऊन बसेल. त्यामुळे दोघांपैकी फक्त अण्णासाहेबांनीच राजकारणात राहणे काकांना योग्य वाटले. " " घराणेशाही हा प्रकार आपल्याकडे सर्वच क्षेत्रांत पूर्वापार चालत आलेला आहे व त्या पार्श्वभूमीवर आपल्या नकारामागचे रावसाहेबांचे पहिले कारण त्यांची खऱ्याखुऱ्या लोकशाहीप्रतीची निष्ठा दाखवणारे आहे. आणि दुसरे कारण बंधुप्रेमाला अजुनी चालतोची वाट... ४२५