पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोडवण्यासाठी त्याची आज गरजही नाही. यापेक्षा तुम्ही विधायक काहीतरी करा, सहकारात शिरा, चांगल्या संस्था उभारा, तुमच्या गावच्या चार लोकांना पोटापाण्याला लावा. त्यातच तुमचं भलं आहे, आणि त्यातच समाजाचंही भलं आहे." रावसाहेबांना हा सल्ला आजही खूप मोलाचा वाटतो, कारण आजही काही स्वार्थी नेत्यांनी भावना भडकवल्यामुळे हिंसक आंदोलने पेटवणारे, एसटी बसेस जाळणारे आणि टोलनाके लुटणारे, कोणाच्यातरी हातचे बाहुले बनून आपल्या स्वत:च्या आयुष्यातील ऐन उमेदीची वर्षे फुकट दवडणारे अनेक तरुण अवतीभवती दिसतात. अशावेळी रावसाहेबांना यशवंतरावांचे शब्द आठवतात, स्वतःचाही भूतकाळ आठवतो आणि आतल्याआत गलबलून येते. या सहकारी चळवळीकडे पाहण्याच्या दोन बाजू आहेत. यातून सरकार आणि समाज यांना विधायक कार्यासाठी एकत्र आणणारे एक माध्यम (इंटरफेस ) तयार झाले; लोकांचा आर्थिक स्तर उंचावला, शिक्षणाचा प्रसार झाला, लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला बळ लाभले आणि एकूणच समाज अधिक प्रगत होत गेला; ही एक बाजू झाली. पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पर्याय म्हणून सहकारी चळवळ उभी राहील ही अपेक्षा मात्र फोल ठरली. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष हळूहळू सहकारातही शिरले. खासगी उद्योगक्षेत्राप्रमाणे सहकारी संस्थांवरही एका एकाच कुटुंबाचे आज वर्चस्व दिसते. किंबहुना एकाच कुटुंबाच्या हाती होणारे सत्तेचे केंद्रीकरण ती संस्था वा उद्योग उत्तम चालण्यासाठी आपल्या समाजात उपयुक्तही ठरते, असेही एक चित्र समोर येते. त्या सगळ्याचे विश्लेषण करण्याचे हे स्थान नव्हे; पण सहकारी चळवळ ज्या राजकीय प्रक्रियेतून उभी राहिली, त्या राजकीय प्रक्रियेचे व सरकारी यंत्रणेचे अनेक फायदेही आहेत आणि त्यातून व्यापक समाजपरिवर्तन घडू शकते हे रावसाहेबांना पटले. उदाहरणार्थ, मूठ-मूठ धान्य गोळा करून शाळा चालवायचे कर्म रांचे दिवस आता इतिहासजमा झाले; वेतन आयोगानुसार द्यावा लागणारा शिक्षकाचा पगार सरकारी अनुदानाशिवाय आज कोणालाच परवडणे शक्य नाही; देणग्यांमधून वा त्यागातून उभारलेला निधी फारतर पाच-दहा टक्के आणि सरकारकडून उपलब्ध होणारा निधी नव्वद पंच्याण्णव टक्के हेच आजचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत सरकारशी व ते चालवणाऱ्या राजकीय नेत्यांशी जुळवून घेणे संस्थेच्या हिताचे आहे आणि व्यापक समाजपरिवर्तनासाठी ते अपरिहार्य आहे, हीच साधारण रावसाहेबांची भूमिका बनली. एका अगदी वेगळ्या संदर्भातही सरकारी हस्तक्षेपाची आज खूप गरज आहे असे रावसाहेबांना वाटते व ती गोष्ट म्हणजे कालबाह्य कायदे बदलण्याची. एक अजुनी चालतोची वाट... ४२४