पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांना आली. त्यांची एकूण जीवन विषयक दृष्टीच त्यातून बदलली. सरकारकडे पाहण्याच्या आणि त्या सरकारचे नियंत्रण करणारी शक्ती म्हणून राजकीय नेत्यांकडे पाहण्याच्या रावसाहेबांच्या दृष्टिकोनातही काळाच्या ओघात खूप फरक पडला आहे. बेचाळीसच्या आंदोलनात सहभागी होताना हे सरकार परकीयांचे आहे व म्हणून त्याला विरोध केलाच पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. नंतरच्या काळात इतर काही मित्रांप्रमाणे त्यांनी कायमच सरकारविरोधी भूमिका घेतली नसली, तरी आपण बरे की आपले काम बरे असा विचार करून ते सरकारपासून व राजकीय नेत्यांपासून दूरच राहिले. पण पुढे हळूहळू त्यांचा हा दृष्टिकोन बदलत गेला व त्यासाठी यशवंतराव चव्हाण हे मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरले. भारतासारख्या खंडप्राय आणि मागासलेल्या देशात सरकार हे समाजपरिवर्तनाचे सर्वांत मोठे साधन आहे याची सुस्पष्ट जाण यशवंतरावांना होती. किंबहुना त्यामुळेच ते राजकारणात सक्रिय झाले व शक्य होते तोवर सत्तास्थानी राहिले. त्यांचा मोठेपणा हा, की या सत्तेचा उपयोग त्यांनी स्वार्थासाठी कधी केला नाही. ते वारले तेव्हा त्यांच्या बँक खात्यात अवघे छत्तीस हजार रुपये होते आणि त्यांची कुठेही प्रॉपर्टी नव्हती. ही एकच घटना खरेतर पुरेशी बोलकी आहे. यशवंतरावांनी ग्रामपंचायती, पंचायतसमित्या, जिल्हा परिषदा अशा ठिकाणी सहभागी व्हायला ग्रामीण तरुणांना उद्युक्त केले. तसेच गावोगावचे कर्तृत्ववान तरुण हेरून त्यांनी त्यांना सहकारी संस्था स्थापन करायला संपूर्ण सहकार्य केले. पतसंस्था, कृषिसेवा केंद्रे, साखर कारखाने, दूधसंघ अशा विविध सहकारी संस्थांचे जाळेच त्यांनी महाराष्ट्रात उभे केले. या संस्था सहकारी असल्या तरी त्यांना भांडवल उभारणीपासून जमिनी देण्यापर्यंत सरकारने प्रचंड मदत केली. किंबहुना सढळ सरकारी मदतीशिवाय त्या उभ्याच राहू शकल्या नसत्या. यातूनच राज्याचे राजकीय नेतृत्व उभे राहिल्यामुळे यशवंतरावांचे सत्तास्थान खूप मजबूत झाले, हा त्यांचा फायदा म्हणता येईल; पण त्यामुळे राज्यात सहकारातून समाजपरिवर्तन करणारी केंद्रे जागोजागी उभी राहिली हेही खरे आहे. यासंदर्भात यशवंतरावांची एक बोलकी आठवण रावसाहेब सांगतात. सरकारविरोधी आंदोलनात सहभागी असलेल्या, त्यापायी तुरुंगवासही भोगलेल्या काही तरुण कार्यकर्त्यांसोबत एकदा ते यशवंतरावांकडे गेले होते. त्यांच्या ध्येयनिष्ठेचे यशवंतरावांनी कौतुक केले, पण पुढे ते म्हणाले, "घरदार सोडून, पोलिसांचा मार खात असे तुम्ही किती दिवस वणवण भटकणार ! पोरांनो, मला तुमची दया येते ! सरकार विरुद्ध खूप दिवस लढत राहणं अशक्य आहे आणि समाजाचे प्रश्न अजुनी चालतोची वाट... ४२३