पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असल्याने अण्णासाहेबांना ह्या आग्रहामागचा पोकळपणा लगेच दिसायचा. पाणी प्रश्नावरचे अनेक तज्ज्ञ एकत्र जमले असताना त्यांनी असा प्रश्न टाकला, "झाडे लावा आणि दुष्काळ हटवा असं सांगितलं जातं. पण ज्यावेळी देशात खूप ठिकाणी घनदाट जंगलं होती, तेव्हाही भीषण दुष्काळ पडत होते त्याचं काय?” सगळे तज्ज्ञ यावर गप्प झाले होते. संकरित गाईंचा प्रसार करणे हेदेखील अण्णासाहेबांच्या व नंतर रावसाहेबांच्या दृष्टीने अतिशय अवघड काम होते. खरेतर भारतासारख्या परंपरानिष्ठ समाजात कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाचा किंवा कार्यपद्धतीचा प्रसार करणे हे अवघडच असते. लोकांच्या अंधश्रद्धा आड येतात; जुन्या व्यवस्थेत ज्यांचे हितसंबंध असतात त्यांचा विरोध स्वाभाविकच प्रखर असतो. स्वतःचे वेगळे स्थान व महत्त्व सांभाळण्यासाठी नव्या गोष्टींविषयी गैरसमज निर्माण करणारे आणि एकूणच सर्वसामान्य जनतेचा बुद्धिभेद करणारे विचारवंतही कमी नसतात. भारतात दीडशे वर्षांपूर्वी रेल्वे आली तेव्हा रेल्वेला विरोध करण्यात ह्याच प्रवृत्तीची मंडळी आघाडीवर होती आणि भारतात पन्नासएक वर्षांपूर्वी संगणक आले तेव्हा संगणकाला विरोध करणाऱ्यांतही ह्याच प्रवृत्तीची मंडळी आघाडीवर होती. ट्रॅक्टरपासून खतांपर्यंत आणि सुधारित बियाणांपासून कीटकनाशकांपर्यंत हरितक्रांतीशी संबंधित प्रत्येक गोष्टीला कडाडून विरोध करणारे विद्वान आपल्याकडे पूर्वीही होते आणि आजही आहेत. त्याचप्रकारे संकरित गाईंनाही भरपूर विरोध केला गेला. हा प्रकार निसर्गाच्या विरोधात आहे, यात आपल्या संस्कृतीने पूज्य मानलेल्या गोमातेची विटंबना आहे वगैरे मते हिरिरीने मांडली गेली. विरोध करणाऱ्यांमध्ये अनेक उच्चपदस्थही होते. या सगळ्यांचा विरोध मोडून काढत मणिभाई देसाईंसारख्या ध्येयवादी गांधीवाद्यांनी अण्णासाहेबांसारख्या प्रगतिशील, आधुनिक विचारांच्या राजकीय नेत्यांची मदत घेऊन संकरित गाईंच्या रूपाने शेतकऱ्याच्या दारात कामधेनू आणली; दुधाने उत्पादन अनेक पटींनी वाढले. शेती आणि गोपालन या दोन्ही क्षेत्रांमध्ये जवळजवळ तीस-पस्तीस वर्षे रावसाहेब सक्रिय राहिले. भारतात या कालखंडात घडून आलेल्या हरितक्रांतीचे आणि श्वेतक्रांतीचे ते साक्षीदार होते; किंबहुना या दोन्ही क्रांत्यांमध्ये त्यांना आपले अल्पस्वल्प योगदानही देता आले. त्यातून अवतीभवतीचा ग्रामीण समाज कसा बदलत गेला हे त्यांनी बघितले. केवळ पुस्तकी संकल्पनांच्या आधारे किंवा भावनाप्रेरित संघर्षाच्या आधारे समाज बदलत नसतो; त्यासाठी दीर्घकाळ केले जाणारे रचनात्मक कार्यच आवश्यक असते, याची सुस्पष्ट जाण या कालखंडात अजुनी चालतोची वाट... ४२२