पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खूप काही शिकवून गेली. रावसाहेबांना विद्वानांविषयी खूप आदर आहे; पण कोणाचेही विचार स्वतः पडताळून पाहायचे व मगच स्वीकारायचे असे त्यांचे धोरण आहे. खूपदा विद्वानांचे विचार केवळ पुस्तकी संकल्पनांवर आधारलेले असतात असेही त्यांच्या लक्षात आले आहे. उदाहरणार्थ, ऊसशेतीवर होणारी टीका त्यांना अवाजवी वाटते. सेंद्रिय शेतीच्या बाबतीतही विचारवंतांची भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्याला गोंधळात टाकणारी असते. एकदा रावसाहेबांनीही या विषयावर एका मित्राच्या विनंतीवरून एक लेख लिहून दिला होता. पण फक्त एकदाच ; नंतर कधीही नाही. आज रावसाहेब याबद्दल बरेच प्रश्न उपस्थित करतात. उदाहरणार्थ, देशाची एकूण गरज विचारात घेता एवढ्या व्यापक प्रमाणावर सेंद्रिय खते व सेंद्रिय कीटकनाशके उपलब्ध होऊ शकतील का? त्यांच्या वापराने आवश्यक ती उत्पादनवाढ होऊ शकेल का? भाजीपाला, फळे, कपाशी यांसारखी पिके रोगांपासून वाचवता येतील का ? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गरिबातल्या गरीब माणसाचीही भूक भागू शकेल एवढे अन्नधान्य त्यातून पिकू शकेल का? स्वतः रावसाहेबांनीही आधुनिकतेचा ध्यास घेऊनच तीस-चाळीस वर्षे स्वतःची शेती केली. जे आपण स्वत: केले नाही, त्याचा आपण प्रसार करू नये, असे त्यांना वाटते. म्हणूनच आपले अनेक मित्र सेंद्रिय शेतीचे कट्टर पुरस्कर्ते असले तरी रावसाहेबांनी मात्र सेंद्रिय शेतीचा पुरस्कार कधी केलेला नाही. याबाबतही अण्णासाहेबांची मते त्यांना अनुभवान्ती सर्वाधिक स्वीकारा वाटतात. अण्णासाहेबांचा ज्यात मोठा सहभाग होता त्या हरित क्रांतीमध्ये रासायनिक खते, औषधे, आधुनिक बियाणे या सगळ्यांचा अविभाज्य भाग होता. गव्हापासून सूर्यफुलापर्यंत सगळ्या पिकांसाठी जगभरातील उत्तमोत्तम बियाणे अण्णासाहेबांनी भारतात आणले. रशियाहून परतताना आणलेले सूर्यफुलाचे बीज त्यांनीच श्रीरामपूर परिसरात व एकूण देशातही रुजवले. इतरही अनेक सुधारित पद्धती आणल्या. 'देशादेशी जे भले, टिपुनी येथे आणिले' हीच त्यांची दृष्टी होती. याबाबतचे त्यांचे विचार कुठल्याही प्रकारची पोथीनिष्ठा न बाळगणारे, व्यावहारिक व प्रत्यक्ष अनुभवावर बेतलेले असे होते. याचे कारण जेव्हा या सगळ्या आधुनिक बाबींचा अजिबात वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीनेच शेती होत होती, त्यावेळीही शेतकरी दरिद्रीच होता आणि असंख्य लोक उपासमारीने व कुपोषणाने मृत्युमुखीही पडत होते, हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. बरेचदा तज्ज्ञ मंडळीही जटिल प्रश्नांवर 'बिनतोड उपाय म्हणून आपली स्वत:ची विशिष्ट मते आग्रहीपणे मांडतात. परिस्थितीच्या गुंतागुंतीची पुरेशी कल्पना अजुनी चालतोची वाट... ४२१