पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होता. त्यामुळे ती गरज भागवण्याची किफायतशीर, आधुनिक, कालसुसंगत यंत्रणा उभारणे हाच या कर्जसमस्येवरचा खरा उपाय आहे आणि केवळ पंधरा-वीस सावकारांकडचे कागदपत्र जाळून काहीच साध्य होणार नाही. खरे सांगायचे तर आधुनिक पद्धतीने काम करणाऱ्या आणि किफायतशीर दराने कर्जपुरवठा करणाऱ्या अनेक बँका रावसाहेबांच्या जन्माच्याही आधीपासून मुंबईसारख्या शहरात सुरू झाल्या होत्या; पण त्यांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत तोवर पोचले नव्हते, ही खरी समस्या होती. जसजसे असे छोट्या-छोटया पतसंस्थांचे जाळे ग्रामीण भागातही तयार होत गेले तसतसा सावकारशाहीला बव्हंशी आळा बसत गेला. सावकारशाहीनंतर त्या काळात रावसाहेबांचा रोष शेटजी-भटजींविरुद्ध होता. ते आपले शोषण करतात व त्यामुळे आपण गरीब आहोत ही त्यांची धारणा होती. 'शेटजी-भटजींची काँग्रेस आम्हांला नको' यावर कम्युनिस्ट प्रचारयंत्रणेचा मोठाच भर होता. पण विचार करायला लागल्यावर यातलाही फोलपणा रावसाहेबांच्या लक्षात आला. याचे एक कारण म्हणजे ठाणगावच्या श्रीधर कुलकर्णीपासून नाशिकच्या श्रीधर पुरोहितांपर्यंत अनेक ब्राह्मण शिक्षकांचे त्यांच्यावर खूप चांगले संस्कार होते; पाडळीतल्या सवाईदादांसारखे किंवा संगमनेरच्या डॉ. बी. जी. गाडगीळमामांसारखे मोफत वा अत्यल्प दरात औषधोपचार करणारे ब्राह्मण डॉक्टर्स त्यांच्या घरी जात येत. त्यांच्या वडलांचे मित्र सर्वच जातीजमातींचे होते व त्यांत अनेक ब्राह्मणही होते. हे सगळे विचारात घेतल्यावर तो मुळात अजिबात नसलेला पण प्रचारामुळे अंगी भिनलेला भटजीद्वेष त्यांच्या मनातून पुरता ओसरला. वकिली करायला लागल्यावर अनेक 'शेटजी' देखील त्यांना जवळून बघायला मिळाले आणि त्यांतले चंद्रभानशेट डाकलेंपासून दादाशेठ डहाणूकरांपर्यंत अनेक जण त्यांचे निकटचे मित्रही बनले. शेटजींची संपत्ती ही केवळ शोषणातूनच निर्माण होते असे नाही; चिकाटी, नियोजन व परिश्रम यांचाही त्यामागे मोठा हिस्सा असतो हे त्यांना निरीक्षणान्ती पटले. शेटजी-भटजींच्या शोषणामुळेच समाजात गरिबी आहे, ही भूमिका अगदी बाळबोध आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे, हे त्यांच्या लक्षात आले. अण्णासाहेबांबरोबर सतत होत असणाऱ्या चर्चेतून शेतकऱ्यांच्या गरिबीमागे पाण्याचा अपुरा पुरवठा आणि चुकीचे नियोजन, वाहतुकीची व बाजाराची असुविधा, खते व सुधारित बियाणांचा अभाव, आधुनिक शेती तंत्रे व तंत्रज्ञानाची अनुपलब्धता आणि शेतमालाच्या अत्यल्प किमती ही खरी महत्त्वाची कारणे आहेत हे त्यांना पटले. हरितक्रांतीमुळे शेतीत झालेले परिवर्तन त्यांच्यासमोरच घडले होते. स्वत:च्याच शेतीत त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांतून आलेली समृद्धीही रावसाहेबांना अजुनी चालतोची वाट... ४२०