पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" वदूद मला नेहमी म्हणायचा, की एवढी संपत्ती निर्माण करूनही स्वतः मात्र खूप साधेपणे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारे जेआरडी हे सगळ्यात मोठे समाजवादी आहेत. त्याचे हे मत मला अगदी तंतोतंत पटते." संघर्षाचे राजकारण सोडून विधायक कामाकडे वळलेल्या भाऊसाहेब व वदूद खान या आपल्या दोन जिवलग मित्रांमधील परिवर्तनाचा आणि त्यांच्यामुळे अवतीभवती घडून आलेल्या व्यापक सामाजिक परिवर्तनाचा प्रभाव रावसाहेबांवर पडला व त्यामुळे साहजिकच त्यांचे स्वतःचे विचार पालटले. अर्थात हे उघड आहे, की कुठलेही परिवर्तन केवळ एकाच प्रभावातून घडून येत नाही; आपल्या आईवडलांचा, पत्नीचा, अण्णासाहेबांचा फार मोठा प्रभाव साहजिकच रावसाहेबांच्या जीवनावर प्रथमपासून होताच. त्याशिवाय अहमदनगर कॉलेजच्या बाप्पा हिवाळेपासून सानेगुरुजींपर्यंत आणि मणिभाई देसाईंपासून शेगावच्या शिवशंकर भाऊ पाटलांपर्यंत इतरही असंख्य सुहृदांचा प्रभाव काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रावसाहेबांच्या आयुष्यावर पडत गेला. हे विविध प्रभाव आणि रावसाहेबांचे स्वत:चे जन्मजात बीज (त्यांचे डीएनए) यांच्या साहचर्यातून रावसाहेबांचे विचारविश्व परिवर्तित होत गेले. या परिवर्तनाचे असंख्य पैलू आहेत. नमुन्यादाखल त्यांतल्या काही पैलूंचा इथे उल्लेख करावासा वाटतो. पहिले, आणि कदाचित सर्वात महत्त्वाचे परिवर्तन, या देशातील गरिबी कशी दूर करता येईल याविषयीच्या रावसाहेबांच्या विचारव्यूहातले परिवर्तन आहे. ही गरिबी शोषणामुळे आहे आणि ते शोषण करणाऱ्यांमध्ये सावकार पहिल्या क्रमांकाचे आहेत अशी साम्यवाद्यांची शिकवण होती. तसे पाहिले तर त्यांना आदरणीय असणारे श्रीधरमास्तरही सावकारी करत पण एकूण सावकारी तले शोषणही त्यांनी पाहिले होते. या सावकारशाहीमुळे अनेक आदिवासी तर बिचारे देशोधडीलाच लागले होते. शेतकरी हा शोषित आणि सावकार हा शोषण करणारा हे समीकरण त्यामुळे त्यांच्या मनात पक्के बसले. साहजिकच त्यांच्या वयसुलभ संतापाचा पहिला रोख हा सावकारशाहीविरुद्ध होता. पण पुढे जेव्हा भाऊसाहेब थोरातांनी जोर्वे सहकारी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना वाजवी दरात कर्ज उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आणि 'सावकारी पाशा ' तून त्यांना मुक्त करून दाखवले, तेव्हा रावसाहेबांच्या त्या पोथिनिष्ठ भूमिकेला जोरदार हादरा बसला. विचारान्ती त्यांच्या लक्षात येऊ लागले, की शेतकऱ्यांना अनेक कारणांनी कर्जाची गरज पडतच राहते व ती गरज भागवण्याचा सावकारी हा एक जुनकट, कालबाह्य पण दुर्दैवाने त्यावेळचा एकमेव पर्याय अजुनी चालतोची वाट... ४१९