पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहायला मिळाली नाही. दुर्दैवाने पुढे त्यांच्या वैभवशाली आणि सुखी जीवनाला जणू दृष्ट लागली. त्याबद्दल विस्ताराने लिहिण्याचे हे स्थळ नव्हे. एकाकी अवस्थेत २०१२ साली वदूद खान यांचे निधन झाले. त्याबरोबरच या दोघांच्या जगावेगळ्या मैत्रीचे एक पर्व संपुष्टात आले. पण मित्राची तीव्रतेने आठवण व्हावी असे प्रसंग अधूनमधून येतच राहतात. असाच एक अलीकडचा प्रसंग श्रीरामपूरच्या रयत संकुलातील बी.पी.ओ. सेंटर सुरू करताना आला. टाटा समूहातील एक हैद्राबादस्थित कंपनी हे सेंटर चालवत आहे व 'कमवा व शिका' या रयतच्या योजनेखाली रयतचे दोन- तीनशे विद्यार्थी तिथे अर्धवेळ काम करत असतात. डॉ. रघुनाथ माशेलकरांपासून संदीप वासलेकरांपर्यंत अनेक मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. या सगळ्याचा तपशील पुस्तकात पूर्वी आलेलाच आहे. हे सेंटर सुरू करण्याच्या कामात बरीच दिरंगाई होत होती. त्यावेळी रावसाहेबांनी कंपनीचे सीइओ श्री. राव यांची व्यक्तिगत भेट घेतली. वदूद खानांबरोबरच्या आपल्या प्रदीर्घ मैत्रीविषयी सांगून ते म्हणाले, "ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या एखाद्या प्रकल्पाला दोन कोटी रुपयांपर्यंत मदत करायची स्वतः जेआरडींची इच्छा होती. हा प्रकल्प तसाच आहे. यातून त्यांच्यापुढे विकासाचे दार उघडणार आहे." आपल्या वकिली चातुर्याचा वापर करून रावसाहेबांनी अगदी योग्य मुद्दा, योग्य वेळी व योग्य प्रकारे मांडला होता! त्याचा अपेक्षित तो परिणाम झालाच आणि त्यानंतर कुठलीच चालढकल न करता कंपनीने बीपीओ सेंटर सुरू केले. अर्थात हा केवळ एक प्रसंगोपात्त दिला गेलेला संदर्भ; दैनंदिन जगण्यातील उच्च अभिरुची, आंतरराष्ट्रीय आवाका, धर्मातीतता, घरातील नोकरांकडे पाहण्याचा उदार दृष्टिकोन ह्या सगळ्यांमध्ये वदूद खान व रावसाहेबांमध्ये साम्य आढळते. कॉर्पोरेट जगाविषयी, मुक्त अर्थव्यवस्थेविषयी आणि एकूणच संपत्तिनिर्माणाच्या प्रक्रियेविषयी आज रावसाहेबांच्या मनात कुठल्याही प्रकारचा किन्तु वा पूर्वग्रह नाही. यालाही वदूद खान बरेचसे कारणीभूत आहेत. व्यावसायिक जगात यशाची शिडी चढत चढत वदूद खान वर गेले; पण त्या जोडीनेच टाटा उद्योगसमूहाला आणि काही वर्षांसाठी सार्वजनिक उद्योगक्षेत्रालाही त्यांनी किती भरीव योगदान दिले हे रावसाहेबांनी पाहिलेले आहे. एकूण समाजासाठीही हे योगदान महत्त्वाचे होते, कारण त्याच्यातून संपत्तिनिर्माण होत गेले आणि ते जर झाले नसते, तर समान वाटपाचा आग्रह धरून आपण केवळ गरिबीचेच वाटप केले असते, हेही आज त्यांना जाणवते. एकदा गप्पा मारता मारता रावसाहेब मला सांगत होते, अजुनी चालतोची वाट... ४१८