पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'टाटांचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असतील' हे जेआरडींचे आमंत्रण होतेच. पण " टाटांची नोकरी सोडून तुम्ही सरकारमध्ये आलात; आता इथली नोकरी सोडून पुन्हा टाटांकडे जाऊ नका," अशी अट इंदिराजींनी त्यांना घातली होती. त्यामुळे तो रस्ता खुंटला होता. १९७६ साली भारतातील कॉर्पोरेट जग तितकेसे विकसित झाले नव्हते. त्यामुळे खासगी क्षेत्रात त्या तोलामोलाची नोकरी मिळणे अवघड होते. त्याच सुमारास दुबई येथील एका खूप मोठ्या कंपनीकडून त्यांना आमंत्रण आले व त्यानुसार वदूद खान दुबई येथे जाऊन त्या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर बनले. जगातल्या अनेक देशांमध्ये या कंपनीचे जाळे पसरलेले होते व त्यामुळे त्यांच्या कर्तबगारीला तिथे खूप वावही मिळाला. अर्थात भारतात त्यांचे जाणेयेणे चालूच होते. आपल्या कम्युनिस्ट पक्षातील एकेकाळच्या सर्वच सहका-यांनी एकदा जग फिरून आले पाहिजे; त्यामुळे दारिद्र्य आणि मागासलेपणावर मात करून जग कुठल्या कुठे गेले आहे याची त्यांना कल्पना येईल आणि आपल्या झापडबंद व कालबाह्य विचारसरणीमुळे आपण किती मागे पडलो आहोत हेही त्यांच्या लक्षात येईल असे वदूदना खूप वाटे. रावसाहेबांनीही एकदा जगप्रवास करावा असे वदूदनी सुचवले. आणि नुसते सुचवले एवढेच नव्हे तर "तुम्हां दोघांचीही सर्व व्यवस्था माझे ऑफिस करेल. तेच विमानाची तिकिटे काढतील, हॉटेल बुकिंग करतील. सगळा खर्च आमची कंपनी करेल, तुम्ही फक्त कधी निघायचे एवढे ठरवा," अशी अगदी ठोस आणि उदार ऑफरही वदूदनी दिली. पण अशी अभूतपूर्व संधी समोर येऊनही, का कोण जाणे रावसाहेबांनी ती घेतली नाही. काळाच्या ओघात पुढे वदूद खान भारतात परतले. लोणावळा येथे निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी सुरेख बंगला बांधला त्यांच्या व सुशीलाताईंच्या आग्रहामुळे शिंदे पतिपत्नी अनेक वेळा तिथे जात असत. त्यांच्याकडे ड्रायव्हर, स्वयंपाकी, घरकाम करणारा नोकर, माळी व इतरही नोकरचाकर असा भरपूर लवाजमा असायचा. त्यांचे नोकरही त्यांच्याकडे कित्येक वर्षांपासून काम करणारे व इमानदार असत. सगळ्या नोकरचाकरांवर या जोडप्याचे नितांत प्रेम असायचे. ते जे खात तेच ते सर्व नोकरांना मुक्तहस्ते देत. शिंदे पतिपत्नींना मोठे आश्चर्य वाटायचे, की इथे नऊ-दहा माणसांचा स्वयंपाक का व्हायचा; कारण तिथे घरचे म्हटले तर दोघेच असत. बाकी सात-आठ जणांचा खाना हा केवळ नोकरांसाठी असायचा! त्या नोकरांना पगारदेखील प्रमाणाबाहेर जास्त वाटावेत असे असायचे. नोकरचाकरांच्याबरोबर एवढी सौहार्दपूर्ण वागणूक रावसाहेबांना इतरत्र कोठेही अजुनी चालतोची वाट... ४१७