पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणसे अधिकारपदी असणे आवश्यकच आहे; कारण अधिकारपदी असणारी व्यक्ती जर गरिबांविषयी खराखुरा कळवळा असणारी नसेल, तर सोसायट्या आणि बँकासुद्धा सावकारांपेक्षा क्रूर बनू शकतात.) संगमनेर सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ भाऊसाहेबांनीच रोवली. आज हा कारखाना म्हणजे या परिसरातील पालकसंस्थाच आहे. 'राजहंस' या नावाने दूध व दुग्धजन्य पदार्थ महाराष्ट्रभर विकणारा दूधसंघ, शिक्षणसंस्था, बँक, उपसा जलसिंचन अशा वेगवेगळ्या विकासवाटा हळूहळू निर्माण झाल्या. 'सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास' हे सूत्र सतत भाऊसाहेबांच्या डोळ्यांपुढे होते. भाऊसाहेबांचे स्वतःचे जीवनही 'बोले तैसा चाले' या उक्तीनुसारच होते. त्यांचा प्रामाणिकपणा एवढा पराकोटीचा होता, की त्यांना कुठे खासगी प्रवासाला जायचे असेल, तर ते रावसाहेबांसारख्या मित्राकडून गाडी मागवून घेत. खरे म्हणजे एवढ्या मोठ्या उद्योगाचे प्रमुख म्हणून मोटारींचा ताफाच त्यांच्यासमोर उभा असे. पण खासगी वापरासाठी त्यांना स्पर्शही करण्याचे कधी भाऊसाहेबांच्या मनात येत नसे. भाऊसाहेबांनी सहकाराची वाट धरली. सहकाराला सदाचाराची जोड दिली. पन्नास-साठ वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यातून हजारो हातांना काम मिळाले, हजारो घरांमध्ये समृद्धी आली. अत्यंत दरिद्री, कायम दुष्काळग्रस्त, मागासलेल्या अशा संगमनेर-सिन्नर- अकोले या तीन तालुक्यांचा कायापालट झाला. खरा विकास क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतूनच होतो; हजारो लोकांनी सातत्यपूर्वक नेटाने केलेल्या कार्यातून होतो, हे एक मूलभूत सत्य भाऊसाहेबांना पटले आणि त्यांनी ते इतरांना पटवले. सामाजिक स्थित्यंतराची ही प्रेरणादायी कथा रावसाहेबांच्या डोळ्यांसमोरच साकार झाली, त्यातील प्रत्येक ओळीचे ते साक्षीदार होते. रावसाहेबांच्या दुसऱ्या एका जिवलग साम्यवादी मित्राच्या आयुष्यातील स्थित्यंतरदेखील असेच विलक्षण होते. ही कहाणी आहे वदूद खान यांची. या दोन्ही स्थित्यंतरांची पार्श्वभूमी अगदी वेगळी असली, तरी त्यामागची प्रेरणा आत्मविकास व त्यातून समाजविकास हीच होती. वदूद खान हे रावसाहेबांपेक्षा वयाने आठ-दहा वर्षांनी मोठे. मुंबईत राहून कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करत. पहिल्या भेटीतच रावसाहेबांचे आणि वदूद खानांचे सूर जुळले. पुढे रावसाहेबांप्रमाणे त्यांनीही साम्यवादाची साथ सोडली. वेगवेगळ्या वाटांनी दोघांची वाटचाल सुरू झाली. दहा-बारा वर्षे अशीच गेली. त्यानंतर कृषिमंत्री या नात्याने एकदा अण्णासाहेबांनी मुंबईच्या टाटा ऑइल अजुनी चालतोची वाट... ४१४