पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खुणा आजही जागोजागी दिसत असल्या, अगदी अंगावर येणारी विषमता आपल्या अवतीभवती दिसत असली, तरी बरेच परिवर्तनही झाले आहे यातही काही शंका नाही. शिक्षणाचा प्रसार, शेतीतील सुधारणा, विज्ञान-तंत्रज्ञानाचा वाढता वापर, औद्योगिकीकरण, खेड्यापाड्यांपर्यंत झिरपलेली लोकशाहीकरणाची प्रक्रिया अशा अनेक प्रभावप्रवाहांचा परिपाक म्हणून हे परिवर्तन झाले आहे; आजही होत आहे. रावसाहेबांचे जीवन म्हणजे गेल्या सहा-सात दशकांत समाजात झालेल्या या परिवर्तनाचा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यांच्या दोन जवळच्या मित्रांच्या जीवनातील स्थित्यंतर समजून घेणे या संदर्भात खूप उपयुक्त होईल; कारण त्या स्थित्यंतराचा रावसाहेबांवरही बराच प्रभाव पडलेला आहे. त्यांतला पहिला मित्र म्हणजे भाऊसाहेब संतुजी थोरात. जोर्वे हे प्रवरा ऊर्फ अमृतवाहिनी या नदीकाठी वसलेले एक छोटेसे गाव. याच गावात १२ जानेवारी १९२४ रोजी भाऊसाहेबांचा जन्म झाला. भाऊसाहेबांनी बेचाळीसच्या चले जाव आंदोलनात उडी घेतली. पुढील तीन वर्षे ते गुप्तपणे चालणाऱ्या क्रांतिकार्यात सहभागी झाले. तुरुंगात असतानाच ते सहबंदी असलेल्या अण्णासाहेब शिंदेंकडे आकृष्ट झाले. अण्णासाहेब त्यावेळी साम्यवादी विचारांच्या पगड्याखाली आले होते व दोघेही तुरुंगातून बाहेर पडले ते पूर्णतः साम्यवादी म्हणूनच. आधी ब्रिटिशांविरुद्ध गनिमी काव्याने लढणारे भाऊसाहेब आता स्वतंत्र भारताच्या सरकारविरुद्ध गनिमी काव्याने लढू लागले. १९४२ ते १९५१ अशी आयुष्याची नऊ वर्षे सर्वस्वाची होळी करून चळवळीत सहभागी होऊनही पदरात काहीच पडलेले नाही, भोवतालचा समाज जसा होता तसाच राहिलेला आहे, त्याची गरिबी आणि मागासलेपणा तिळमात्रही हटलेला नाही याची अत्यंत विदारक जाणीव यांना पुढे झाली. जोर्वे गाव हे अतिशय गरिबीतच नांदणारे होते. जोर्वे सहकारी संस्था ही ग्रामपातळीवरील पतसंस्था या गावातील पहिलीच. भाऊसाहेबांचे चुलते दामोदर गंगाराम पाटील थोरात ऊर्फ नाना हे या पतसंस्थेचे संस्थापक चळवळीच्या राजकारणाला विटलेल्या भाऊसाहेबांच्या हाती १९५२ साली पतसंस्थेची सूत्रे सोपवून त्यांनी भाऊसाहेबांना सहकाराची दीक्षा दिली. अडचणीच्या वेळी होऊ शकणारा कर्जपुरवठा ही स्थानिक शेतकऱ्याची खूप प्राथमिक गरज होती. पतसंस्थेमुळे ती भागली. अवाच्या सवा व्याज आकारणाऱ्या 'सावकारी पाशा'तून शेतकऱ्यांची सुटका झाली. (अर्थात इथेही चारित्र्यवान अजुनी चालतोची वाट... ४१३