पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असेही नाही; बहुतेक घटना म्हणजे अनेक कारणांचा एकत्रित परिणाम असतो. तेव्हा कारणे काहीही असोत; ९ मे २००८ रोजी संस्थेचे प्रेसिडेंट शरदराव पवार यांचा विनंतीवजा आग्रह मान्य करून रावसाहेब रयतचे चेअरमन बनले आणि त्यानंतरची संस्थेची सहा वर्षांतील वाटचाल ही शरदरावांची निवड किती योग्य होती याची साक्ष पटवणारी आहे. रयतच्या चेअरमनपदाचा कालावधी तीन वर्षांचा असतो. पहिला कार्यकाळ संपल्यानंतर २०११मध्ये रावसाहेबांची चेअरमनपदावर पुनर्नेमणूक झाली आणि त्या नेमणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नुकतीच, म्हणजे मे २०१४मध्ये रावसाहेबांची रयतच्या चेअरमनपदी तिसऱ्यांदा नेमणूक झाली आहे. संस्थेच्या घटनेनुसार हा नवा कालावधी पुढील तीन वर्षांसाठीचा, म्हणजे मे २०१७ पर्यंतचा असेल. संकल्पित सेवानिवृत्ती दूरच राहिली; रावसाहेबांचे आयुष्य आज पूर्वीइतकेच भरगच्च आहे. वाढत्या 'शुगर' बद्दल आणि दुखऱ्या गुडघ्यांबद्दल कुरकुर करत बसणारे अनेक वृद्ध आपल्या अवतीभवती दिसतात. आज वयाच्या शाऐंशी व्या वर्षीही रावसाहेबांच्या ओठांवर असले तब्येतीचे रडगाणे कधीही नसते. महिन्यातले वीस दिवस ते प्रवासात असतात. पण रोजचा व्यायाम व फिरणे ते सहसा कधी चुकवत नाहीत. कुठले ना कुठले काम घेऊन आलेल्यांचा घोळका भोवताली कायम असतो. असे म्हणतात, की दिवसाचे चोवीस तास ज्याला कमी पडतात, तो तरुण आणि चोवीस तास ज्याला खायला उठतात, तो म्हातारा. त्या व्याख्येनुसार आज रावसाहेब कुठल्याही तरुणापेक्षा जास्त तरुण आहेत. संन्यासाश्रम तर सोडाच, वानप्रस्थाश्रमही अजून त्यांच्यापासून खूप दूर आहे असे वाटते. काही वर्षांपूर्वीचे ते उद्विग्नतेचे मळभ आता पुरते दूर झाले आहे. काही जणांना आपला वृद्धापकाळ हा शांत, निवांत असावा, निष्कंप सरोवराप्रमाणे असावा असे वाटते. रावसाहेबांना मात्र सरोवरासारखे आयुष्य मानवणारे नाही. साचलेल्या पाण्यावर शेवाळ धरते, किडे तयार होतात असे त्यांना वाटते. त्यापेक्षा खळाळत्या, फेसाळ, वाहत्या पाण्यासारखे आयुष्य त्यांना प्रिय आहे. त्यांच्या गावच्या म्हाळुंगी नदीसारखे. म्हाळुंगी नदीकाठचे रावसाहेबांचे जन्मगाव पाडळी आता किती बदलले आहे, याचा उल्लेख या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात आलाच आहे. अर्थात हा बदल फक्त एखाद्या गावापुरता सीमित नाही. दारिद्र्याच्या आणि एकूण मागासलेपणाच्या अजुनी चालतोची वाट... ४१२