पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्तापद नाही त्याला लोकसंपर्क आणि वेळेचे नियोजन यांचा मेळ घालणे अवघड जाते; सत्तेवर असलेल्यांची यंत्रणा, त्यांची इच्छा असल्यास, ते काम करू शकते. इच्छुकांना भेटणे, त्यांचे आतिथ्य करणे, बैठका, सभा, संमेलने, प्रचार, भेटीगाठी, प्रवास या चक्रात अडकले, की बाकी बाबी दुर्लक्षिल्या जातात. मी तर अनेक संस्थांच्या कार्यात माझ्या परीने सतत कार्यरत राहिलो. त्यातच जीवन व्यतीत झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मी पुस्तकांचा चाहता. पुस्तकांच्या घरात राहावे हे तुमच्या घरी आल्यावर मला खूप जाणवायचे. लिहिणेही मला आवडते. तथापि, माझी वाटचाल वेगळ्याच विश्वात चालू राहिली. माझे बंधू अण्णासाहेब भेटले की विचारीत, 'काय वाचले ?' मला समाधानकारक उत्तर देता येत नसे. नोकऱ्या बदल्यांचे काम हे शैक्षणिक काम नव्हे, असेही ते स्पष्ट सांगत; पण मी 'रयत'मध्ये त्या चक्रात अडकलो हे खरे!" , , इतरांना सांगण्यासारखे असे मौलिक विचारधन व अनुभव लेखकाजवळ असणे आवश्यक आहेच व तसे ते रावसाहेबांपाशी आहे यात काही शंका नाही. त्यांच्या रसाळ आणि उत्कट व्यक्तिचित्रणातून त्यांचे समृद्ध अनुभवविश्व जाणवते, त्यांच्या लेखनातील संदर्भबाहुल्यातून त्यांचे सखोल वाचन जाणवते. मूल्यांचा व चारित्र्याचा आग्रह हा तर त्यांच्या लेखनाचा जणू स्थायिभाव आहे. परंतु लेखनासाठी तेवढेच पुरेसे नाही. इतर कुठल्याही कलेप्रमाणे लेखनासाठीही पुरेशी साधना करावी लागते. लेखन, संस्करण, पुनर्लेखन यांसाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. मनाची एकाग्रता साधावी लागते. अंतर्मुखता जपावी लागते. एकान्त सांभाळावा लागतो. रावसाहेबांचा एकूण कार्यविस्तार व दिनक्रम बघितला तर असे जाणवते, की बहिर्मुखता हा त्यांच्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. एकान्तापेक्षा लोकान्तात ते अधिक रमतात. या वयातही ते करत असलेला एकूण प्रवास, त्यांचा मोठा संपर्क व त्यांनी घेतलेल्या एकूण जबाबदाऱ्या घितल्या तर सकस साहित्यनिर्मितीसाठी आवश्यक असलेला सलग आणि प्रदीर्घ असा निवांतपणा त्यांच्या वाट्याला किती येत असेल याविषयी प्रश्न पडतो. त्यांचा एकूण पिंडही कलावंतापेक्षा लोकशिक्षकाशी अधिक साधर्म्य साधणारा आहे. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाप्रमाणेच त्यांचे लेखनही प्रेरणादायी व विचारप्रवर्तक आहे; पण त्यांच्या जवळजवळ सर्वच लेखनात शब्दकळेपेक्षा, आशयाच्या कलात्मक आविष्कारापेक्षा, मानवी जीवनातील व्यामिश्रता किंवा गुंतागुंत यांचा वेध घेण्यापेक्षा प्रबोधनावर अधिक भर आहे. ही प्रबोधनपरता हे रावसाहेबांच्या साहित्याचे मोठे सामर्थ्य आहे; पण कदाचित तीच त्या साहित्याची मर्यादाही मानता येईल. अर्थात हे आपण महात्मा गांधींपासून सानेगुरुजींपर्यंत अनेकांच्या लेखनाविषयी साहित्यशारदेच्या प्रांगणात... ४०७