पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि महान व्यक्तींचा, जे स्वत: मान्यवर साहित्यिकच होते, पाणउतारा करण्यातला विघ्नसंतोषीपणा साहित्यक्षेत्राला गालबोट लावणारा आहे. गुणवत्तेच्या मुद्द्यावर कोणा व्यक्तीविषयी टीका समजण्यासारखी आहे, पण केवळ राजकीय क्षेत्रातली व्यक्ती म्हणून त्यांना दुय्यम वागणूक देण्याचा विचार मला अगम्य वाटतो. ही न्यूनगंडाची भावना आहे की काय असेही वाटते. शासनाकडून आर्थिक साहाय्य घ्यायचे, पण लगेचच शासकीय मदतीचा धिक्कार करण्याचा मानभावीपणा दाखवायचा! कळत नकळत राजकीय व्यक्तींनाही धिक्कारायचे! ही बाबदेखील हास्यास्पद आहे. वृथा स्वाभिमानाचा डंका वाजवायचा, पण आर्थिक लाभ नाकारण्याचे धैर्य न दाखवता त्यासाठी झोळी मात्र पुढे करायची, हेदेखील तेवढेच हास्यास्पद आहे. स्वत:ला विचारवंत म्हणवून घेणारी मंडळी असे कोणत्याच विचाराची संगती नसणारे वर्तन का करतात, हे मला कधीही उमजलेले नाही. साहित्यिकांच्या अशा बाबींविषयी सखोल चिंतन होणे मला आवश्यक वाटते, तथापि असे कधीही होणे नाही, अशीच एकंदर परिस्थिती दिसून येते.” (ध्यासपर्व, ५४२ - ३) काही साहित्यिक मात्र आपल्या वेगळ्या वागण्यामुळे रावसाहेबांना आदरणीय वाटत आले आहेत. ते म्हणतात, " साहित्यातून तर समाजाला प्रेरणा मिळतेच, पण ती साहित्यिकापासूनही मिळते. माझा स्वतःचा अनुभव असा, की सानेगुरुजी, कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, केशवसुत यांच्यासारख्या साहित्यिकांपासून समाजाला प्रेरणा मिळाली. पु. ल. देशपांडे यांचे स्वतःसाठी काही न ठेवता देणग्या देण्याचे औदार्यदेखील खूपच प्रेरणादायी. विशेष प्रशंसनीय बाब अशी, की आपल्या स्वतःच्या गरजा कमी करून, कमीत कमी अर्चामध्ये जीवन व्यतीत करून, काटकसरीने जगून केलेला धनसंचय हा सगळा त्यांना योग्य वाटलेल्या संस्थांना त्यांनी देणगी म्हणून दिला. हे औदार्य कर्णाच्या औदार्याच्याच जातीचे म्हणावे लागेल. कुसुमाग्रजांचेही तसेच. त्यांनीदेखील त्यांचे घर व मिळकत कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देऊन टाकली आहे. सानेगुरुजी तर मिळकत मिळविण्याच्या गावाला गेलेच नाहीत. यदुनाथ थत्ते आणि राजा मंगळवेढेकर हे साहित्यिक देशासाठी समर्पित भावनेने आयुष्यभर आपले योगदान देत राहिले. त्यांचाही एक वेगळाच आदर्श. ग. प्र. प्रधानही याच मालिकेतले. हे सगळे आदर्श केवढीतरी प्रेरणा समाजाला देऊन जातात. अशा साहित्यिकांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे." इथे हे नमूद करायला हरकत नाही की अनेक साहित्यिकांबरोबर रावसाहेबांचे साहित्यशारदेच्या प्रांगणात... ४०५