पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काळ्या बाजूशीही त्यांचा विद्यार्थिदशेपासूनच परिचय झाला होता. उदाहरणार्थ, 'मराठी नाट्यसृष्टीची शंभर वर्षे' या विषयावर कोल्हापूरला शिकत असताना त्यांनी खूप परिश्रमपूर्वक एक निबंध लिहिला होता व त्याला त्यावेळी शंभर रुपयांचा प्रथम पुरस्कारही मिळाला होता. पण तो एका नामवंत साहित्यिकाने 'चोरला' व स्वत:च्या नावाने छापूनही आणला तो प्रसंग. त्यांच्या महाविद्यालयातील दिवसांविषयी लिहिताना हा प्रसंग आलेलाच आहे. त्यानंतरच्या काळातही रावसाहेबांना साहित्यिकांचे असे अनेक कटू अनुभव येत गेले व त्याविषयी त्यांनी परखडपणे लिहिलेही आहे. आपल्या आत्मकथनात ते लिहितात : }} } "साहित्याच्या व साहित्यिकांच्या विश्वात रममाण होताना मला सारखे असे जाणवते, की साहित्याचे तसेच साहित्यिकांचे संस्कृतीशी अतूट नाते असावे. किंबहुना, संस्कृतीशिवाय साहित्य आणि साहित्यिक असूच शकत नाही. संस्कृती ही सद्विचार आणि सदाचार यांच्याशी निगडित असलीच पाहिजे. तसेच संस्कृतीमुळे चारित्र्य आणि शील यांची जोपासनाही व्हायलाच पाहिजे. माझ्या या विचारांशी कदाचित सर्व जण सहमत होण्याची शक्यता कमी. मात्र मी या विचारांवर ठाम आहे. माझ्या या विचाराला बऱ्याच साहित्यिकांच्या वागण्याने धक्के बसतात. ' या धक्कादायक वागण्याचे एक उदाहरण देताना रावसाहेब लिहितात : "साहित्य संमेलनाचा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. लाखो रुपयांचा चुराडा होत असतो. हा सगळाच खर्च योग्य व वाजवी असतो का, याबाबत गांभीर्याने चर्चा व्हायला पाहिजे. दुसरा, साहित्यिकांना कटू वाटेल असा, मुद्दा असा की या एवढ्या मोठ्या खर्चाच्या विषयात साहित्यिकांचे योगदान काय ? कुणाही साहित्यिकाने साहित्य संमेलनासाठी आर्थिक योगदान दिल्याचे कधीच दिसून येत नाही. उलट त्यांच्याच सोई, सुविधा खूपच मानपानाने करण्यात याव्यात यासाठी ते आग्रही असतात. त्यांच्य व्यवस्थेपायी बराच खर्च करावा लागतो. जणू ते या सोहळ्यातले जावई असल्याच्या थाटात वागत असतात. वास्तविकरीत्या साहित्य संमेलन साहित्यिकांनीच घडवून आणायला पाहिजे, त्यासाठी आधी आपले भरीव आर्थिक योगदान व मग समाजाकडून सहभागाची अपेक्षा असा क्रम पाहिजे. होते ते मात्र उलटेच. त्यामुळे साहित्य संमेलन सतत वादाच्या भोवऱ्यात राहत आलेले आहे. साहित्यिकांची आत्मपरीक्षणाची तयारी मात्र कुठेही दिसून येत नाही." याच संदर्भात पुढे ते म्हणतात, "राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना तुच्छ लेखणे आणि आपण स्वतः विशेष कोणीतरी आहोत असा अहंभाव बाळगणे सततच साहित्यिकांच्या विचारात, उक्तीत व कृतीत दृगोचर होत आलेले आहे. यशवंतराव चव्हाणांसारख्या आदरणीय अजुनी चालतोची वाट... ४०४