पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सेवकांचा मला मनापासून पाठिंबा मिळाला. तसेच शाळेत काम करण्यासाठी शिक्षकांची निवड केली. शाळेला अनुदान नाही, स्वत:ची इमारत नाही, सगळेच नवीन आहे, सुरुवातच आहे, अशी सर्व परिस्थिती समजावून सांगून व ध्येयवादाने कमीत कमी वेतनावर काम करण्याचेही मी त्यांना आवाहन केले. हे शिक्षक तरुण मुले व मुली होत्या. त्यांनी मला खूपच प्रतिसाद दिला. केवळ चारशे रुपये महिना वेतनावर हे शिक्षक काम करत होते. त्यांना राहायला जागा नव्हती. बोरावके महाविद्यालयाच्या वसतिगृहात त्यांची राहण्याची व्यवस्था मी करून दिली. चारशे रुपये महिन्याला फक्त जेवणासाठीच लागत. भराभर विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागली. बोरावके महाविद्यालयातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात उसनवार रक्कमही घेतली. तसेच तीनही महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आवाहन करून वेळोवेळी हजारो रुपयांची देणगी मी जमा केली. हजारो रुपये जमत होते. त्याच महाविद्यालयातील पठाण नावाच्या एका शिपायाने तर दहा हजार रुपयांची देणगी दिली. शांतीभाई सोमैय्यांच्या श्रीरामपूरच्या भेटीत अकरा लाख रुपयांची देणगी पदरात पाडून घेण्यात आम्ही यशस्वी झालो. याबाबत सुमनभाई शहा यांची चिकाटी खूपच वाखाणण्याजोगी. संस्कार केंद्राविषयी माझ्या आशा, आकांक्षा उंचावल्या. शांतीलाल सोमैय्या यांनी शाखेच्या विकासानुसार आणखीही पाहिजे तेवढी देणगी देण्याची तयारी दर्शविली. या संस्कारकेंद्राची आदर्शाच्या दिशेने वाटचाल चालू होती. पण पुढे हा 'पण' आला. संस्कारकेंद्राचा संस्थापक म्हणून असलेले, तसेच कामाशी व देणग्या जमविण्याशी निगडित असलेले माझे नाव पुसून टाकण्याच्या दिशेने, इतकेच नाही तर माझी अडचण वाटावी या दिशेने, विचारप्रवाह कृतिशील झाला असावा असे वाटण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली. 'इदं न मम' असे म्हणून मी तर लगेच बाजूला झालो. एका आदर्श शाळेचे माझे स्वप्न अधुरेच राहिले. तथापि आता 'ना खेद ना खंत' अशी वृत्ती मी स्वीकारली आहे. मात्र माझे आदरणीय स्नेही पद्मश्री अप्पासाहेब पवार यांच्या शब्दाला मी जागलो याचे मला समाधान आहे." ( ध्यासपर्व, पृष्ठ क्र. ४९१ ते ४९७) रावसाहेबांच्या साहित्यप्रेमामागे एक प्रकारचा आदर्शवाद आहे, समाजपरिवर्तनाची आस आहे व नेमक्या त्याच मानसिकतेतून त्यांनी संस्कारकेंद्राचा हा उपक्रम सुरू केला होता. म्हणूनच या उपक्रमाविषयी इथे काहीशा विस्ताराने लिहिले आहे. रावसाहेबांचे साहित्यप्रेम मनापासूनचे आहे, पण आंधळे नाही, साहित्यसृष्टीच्या साहित्यशारदेच्या प्रांगणात... ४०३