पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या शाळेला देण्याचा विचार झाला. माझा हा विचार प्रत्यक्ष अमलात आणण्याच्या कामी प्राचार्य शिवाजीराव भोर यांनी मला मनापासून साथ दिली. या सुमारास संस्थेने बालवाड्या चालविण्याचे धोरण स्वीकारले होते व या बालवाडीपासूनच संस्कार केंद्राची सुरुवात करावी असा विचार मी केला. १५ जानेवारी १९९५ रोजी संस्कार केंद्र सुरू झाले. इथला अभ्यासक्रम वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळावेगळा असला पाहिजे असे माझे सुरुवातीपासूनचे विचार होते. प्रथम स्वच्छता आणि आरोग्य यांसंबंधी बारीकसारीक तपशीलासह कसे वागायचे हे लहान मुलांच्या अंगवळणी पाडणे, तसेच योग्य आहार कोणता ? काय खावे? काय खाऊ नये? याबाबत माहिती द्यावी, स्वत:चे वर्ग, शाळेचा व भोवतालचा परिसर सुंदर ठेवण्यासाठी मुलांच्या वर झाडणे, झटकणे, पुसणे, खोदणे, दगडमाती उचलणे, रोपे लावणे, झाडांना पाणी घालणे, झाडांची निगा राखणे अशा श्रमांचे संस्कार करायचे, लिखाणाची व वाचनाची गोडी लावायची, सुरुवातीचा अभ्यास प्रामुख्याने गोष्टी, नाच-गाणे, खेळणे अशा प्रकारांतूनच विकसित करायचा, लिहिणे - वाचणे मुलांना ओझे वाटणार नाही अशा पद्धतीने शिकवायचे, निसर्गाशी एकरूप होण्याचे संस्कार करायचे अशा माझ्या विविध कल्पना होत्या. त्यासाठी टॉलस्टॉयची शाळा, रवींद्रनाथ टागोरांचे शांतिनिकेतन, सानेगुरुजींच्या मुलांना शिकविण्याच्या पद्धती आणि इतर शिक्षणतज्ज्ञांचे विचार हे माझे आदर्श होते. मुलांना सकाळपासून ते थेट संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त वेळ शाळेत ठेवायचे, असाही निश्चित विचार मी केला होता. टॉलस्टॉयच्या शाळेप्रमाणे मुले शाळेत हौसेने आली पाहिजेत व शाळेतून घरी जायची त्यांच्या मनाची तयारी नसली पाहिजे, अशा पद्धतीची वातावरणनिर्मिती करायचे ठरविले होते. दरम्यानच्या काळात एकदा माझी प्रकृती बरी नसल्याचे समजल्याने माझे परमस्नेही मा. अप्पासाहेब पवार (बारामती) हे मला भेटण्यास आले. त्यांच्या भगिनी सौ. मीनाताई जगधने यांना घराच्या चार भिंतीबाहेर शिक्षणक्षेत्रात काहीतरी काम करण्याची संधी द्यावी अशी आवर्जून विनंती त्यांनी मला केली. योगायोग असा की, मी केलेली लेखी अर्जातील विनंती मान्य करून संस्थेने मा. अप्पासाहेब पवार यांना सन्माननीय सदस्य करून घेतले होते. संस्थेला हे भूषणावहच होते. मी संस्कार केंद्राच्या कामात कार्यरत होतोच. लगेच मी मीनाताईंना तेथे काम करण्याची संधी दिली. त्यांनीही शाळेचे काम मन लावून पाहिले. त्यांच्या शाळेतल्या कामाचे मी तोंड भरून जाहीररीत्यादेखील कौतुक करत राहिलो. शाळेची वाटचाल सुरू झाली. श्रीरामपूरच्या रयत शिक्षण संस्थेच्या सर्वच अजुनी चालतोची वाट... ४०२