पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'संवादपर्व'चा वाचक त्या माहितीपासून वंचितच राहतो. मांडणीच्या दृष्टीने 'संवादपर्व' कडे पाहतानाही एक-दोन उणिवा जाणवतात. काही अधिकृत, औपचारिक पत्रे गाळता आली असती. रावसाहेबांनी भरभरून लिहावे आणि समोरच्या मान्यवराने केवळ पत्राची पोच म्हणून दोन-तीन वाक्ये लिहावीत हा प्रकार कधीकधी आढळतो. हे टाळता आले असते. त्यामुळे एखाद-दुसरा खंड कमी भरला असता तरी फारसे बिघडले नसते. उलट काटेकोर संपादनामुळे ग्रंथाचा भारदस्तपणा अधिक वाढला असता. असो. या सगळ्यामुळे एकूण 'संवादपर्व'ला फारसा उणेपणा येतो अशातला भाग नाही. मराठीतील पत्रवाङ्मयामध्ये 'संवादपर्व' हा एक मैलाचा दगड गणला जाईल. रावसाहेबांना साहित्याची आवड होती व आजही आहे हे नि:संशय, परंतु केवळ 'साहित्यासाठी साहित्य' किंवा 'कलेसाठी कला' अशी त्यांची भूमिका कधीच नव्हती. त्यांची खरी प्रेरणा ही सामाजिक परिवर्तनाची आहे आणि त्या सामाजिक परिवर्तनाचे एक हत्यार म्हणून, त्या परिवर्तनासाठी आवश्यक ते संस्कार समाजावर करण्याचे एक माध्यम म्हणून ते साहित्याकडे पाहत आले आहेत. कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, सानेगुरुजी यांसारखे लेखकच त्यांना मनापासून आवडत होते यावरूनही त्यांच्या मनाचा एकूण कल आपल्या लक्षात येतो. साहित्याप्रमाणेच शिक्षणातूनही अशा प्रकारचे विधायक संस्कार समाजावर, विशेषत: शाळकरी मुलांवर, करता येतात आणि त्या दृष्टीने श्रीरामपुरातील रयत संकुलात १९९५ साली रावसाहेबांनी सुरू केलेला 'संस्कार केंद्र' हा उपक्रम खूप महत्त्वाचा होता. हा उपक्रम रावसाहेबांच्या खूप जिव्हाळ्याचा होता, त्यात जणू त्यांनी आपला जीव ओतला होता व रावसाहेबांच्या आयुष्यातला तो एक महत्त्वाचा भाग आहे. त्याविषयी रावसाहेब आपल्या आत्मकथनात लिहितात: "राजाभाऊ मंगळवेढेकर, यदुनाथ थत्ते व इतरही शिक्षणक्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या व्यक्ती यांच्याशी मी बऱ्याचवेळा विचारमंथन केले. यातून अशा निष्कर्षाला आलो, की हल्ली महाविद्यालयात असणाऱ्या जाणत्या विद्यार्थ्यांवर नव्याने संस्कार होणे हे तितकेसे सहजसुलभ नाही; त्यापेक्षा लहानपणापासून मुलांच्यावर संस्कार करणे अधिक फलदायी ठरेल. या विचाराला अनुसरून मी लहान मुलांची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ती शाळा म्हणजे प्रामुख्याने 'संस्कार केंद्र' असावे म्हणून 'प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्र' असे नावही साहित्यशारदेच्या प्रांगणात... ४०१