पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एवढा वर्षाव करता ! हा सारा उपचार अगदी एकतर्फी होतो आहे आणि म्हणून तो स्वीकारताना दरवेळी मी अवघडून जात आहे. कालचा तुमचा सत्कार पाहिल्यानंतर माझे छोटेपण मला प्रकर्षाने जाणवले, म्हणून माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा पत्रप्रपंच." (खंड २, पृष्ठ १४३-१४५) आशयाच्या दृष्टीने पाहता 'संवादपर्व' मध्ये दोन उणिवा जाणवतात. पहिली म्हणजे साधारण १९४४ ते १९५० या चळवळीत पूर्ण वेळ घालवलेल्या पाच- सहा वर्षांचा उल्लेख जवळपास कुठेच आढळत नाही. चळवळीत सक्रिय असतानाची गुप्ततेची गरज विचारात घेता त्याकाळची पत्रे उपलब्ध होणे तसे दुरापास्तच आहे, हे समजण्यासारखे आहे, पण त्या कालखंडाचे वर्णन करणारी नंतरच्या काळात लिहिलेली पत्रेही संग्रहात नाहीत. वदूद खान व रावसाहेब यांच्या मैत्रीचे थोडेफार पडसाद 'संवादपर्व' मध्ये उमटतात, परंतु साम्यवादी चळवळीचे पडसाद मात्र उमटत नाहीत. भारत स्वतंत्र झाला त्यावेळच्या सोव्हिएट धोरणानुसार भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नेहरूंना फॅसिस्ट ठरवून सरकारविरुद्ध सशस्त्र आंदोलन छेडले. पण दोन-तीन वर्षांनी स्टॅलिनने दिलेल्या आदेशानुसार पक्षाची भूमिका रातोरात बदलली 'फॅसिस्ट नेहरू' 'सच्चे समाजवादी' ठरले. अण्णासाहेबांना व रावसाहेबांना पक्षाचे सरकारविरोधी आंदोलन खूप चुकीचे आहे, असे सुरुवातीपासूनच वाटत होते, पण त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली. अशा सगळ्या प्रकरणांमुळे अनेक सच्च्या कॉम्रेड्सचा प्रचंड भ्रमनिरास झाला; त्यांना अतोनात मानसिक छळाला तोंड द्यावे लागले. या कालखंडाचे, विशेषत: ग्रामीण पार्श्वभूमीवरचे, चित्रण भारतात फारसे झालेले नाही. ते 'संवादपर्व' मध्ये झाले असते, तर आर्थर कोस्लरच्या 'Darkness At Noon'ची किंवा मिलोव्हन जिलासच्या 'The New Class'ची उंची 'संवादपर्व'च्या त्या भागानेतरी गाठली असती, असे म्हणायला जागा आहे. आशयाच्या दृष्टीने 'संवादपर्व'मधली दुसरी उणीव म्हणजे रावसाहेबांच्या जीवनातील वकिली व्यवसायातली तीसहून अधिक वर्षे 'संवादपर्व'मध्ये नाहीत. एक यशस्वी वकील म्हणून त्यांनी संपादन केलेले आर्थिक यश, त्या व्यवसायातूनही केलेली समाजसेवा, त्यावेळी आलेले मनुष्यस्वभावाचे अनुभव, त्यांतून साधत गेलेली परिपक्वता आणि शेवटी ऐन भरात असताना त्या व्यवसायातून घेतलेली निवृत्ती हा सगळाच कालपट खूप रोमहर्षक आहे व एक व्यक्ती म्हणून रावसाहेबांची जडणघडण कशी झाली, हे समजून घेण्याच्या दृष्टीने तो खूप उपयुक्तही आहे. अजुनी चालतोची वाट... ४००