पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तरीही पहिल्या रांगेत एक महत्त्वाचे आसन अडवून मी बसलो होतो. त्यातही माझ्या उपस्थितीचा उल्लेख इतक्या वेळा झाला, की धरणी दुभंगून मला आता पोटात घेईल तर बरे, असे मला वाटू लागले होते. या जगात पैसा हाच राजा असतो. इथे कोणी किती मिळवले यावर व्यक्तीचा मोठेपणा मोजला जातो. पण लोकसेवेचे/लोकादराचे जे दुसरे जग असते, तेथे 'कोणी किती सोडले?" यावर त्याची पात्रता मापली जाते. तुम्ही खूप खूप मिळविलेत, परंतु तुम्ही जे स्वेच्छेने सोडलेत, ते तुम्ही मिळविले त्यापेक्षा अनेक पटीने अधिक आहे. तुम्हांला लोक 'रावसाहेब' म्हणतात ते तुम्ही जे सोडलेत, त्या तुमच्या 'श्रीमंतीमुळे'. आणि या तुमच्या 'श्रीमंती' मुळेच माझी छाती दडपून जाते. माझ्या 'गरिबी'ची जाणीव तुमच्या उपस्थितीमध्ये मला सतत अस्वस्थ करीत असते. जीवनातल्या सामान्यातल्या सामान्य गोष्टींसाठी तुम्हांला केवढा तरी झगडा करावा लागला होता! दुसऱ्या एखाद्याने जगावर सूड घेण्यासाठी अगदी टोकाचा ऐषआरामाचा जीवनमार्ग पत्करला असता. पण तुमच्यासारखाच झगडा ज्यांना पावलोपावली करावा लागतो, अशांचीच 'वकिली' तुम्ही आनंदाने पत्करलीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत तुमची आजची मिळकत, ही तुम्ही शंभर टक्के स्वतःचा घाम गाळून मिळवलेली 'तुमची मिळकत आहे. माझी गोष्ट याच्या अगदी उलट आहे. मी जन्मलोच एका नामवंत कुटुंबात. त्या कुटुंबाचा लौकिक जन्मजात मला चिकटलेला आहे. माझी संपादकीय कारकीर्द म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचाच प्रकार होता. वडिलांनी जी मासिके मोठ्या नावारूपास आणली होती, ती मी आणखी ३५-४० वर्षे पुढे चालवली, ती बंद पडू दिली नाहीत, हाच काय तो माझा पराक्रम. मी मासिकांना काही देण्यापेक्षा त्यांनीच मला एवढी प्रसिद्धी व मोठेपणा मिळवून दिला. हे सर्व मी एवढ्यासाठीच नमूद करीत आहे, की तुमच्यासारख्या बावन्नकशी गुणी, स्वतःच्या कर्तबगारीने मान्यता मिळविलेल्या व्यक्ती जेव्हा माझ्यावर लोभ करतात, तेव्हा 'या व्यक्तींची मी फसवणूक तर करत नाही ना ? " या विचाराने मी अस्वस्थ होतो. तुम्ही वाकून नमस्कार करता, त्या प्रत्येक वेळी मी हरकत घेतो, त्याचे हे कारण आहे. ज्या मानाला आपण अजिबात पात्र नाही, तो मान दिवसामागून दिवस घेत राहणे हा गुन्हा वाटतो. तुम्ही पती-पत्नींनी आम्हां दोघांवर एवढा लोभ करावा, असे काहीही आम्ही तुमच्यासाठी करू शकलेलो नाही. तुमच्या मनाचा हा मोठेपणा, की आम्ही काहीही दिलेले नसताना तुम्ही मात्र प्रत्येक भेटीत आमच्यावर अकृत्रिम स्नेहाचा साहित्यशारदेच्या प्रांगणात... ३९९