पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यामुळे मग काही महिन्यांनी त्यांची राहायची सोय दादांनी सदूभाऊ आणि लक्ष्मीबाई नळवाडे या आपल्या ओळखीच्या एका वयोवृद्ध कोष्टी जोडप्याच्या घरी केली. त्यांची जळाऊ लाकडे व कोळसे विकण्याची छोटीशी वखार होती. त्यांच्या घरातील स्वैपाकपाण्याची व्यवस्था व एकूण स्वच्छता किसनतात्यांच्या घरापेक्षा चांगली होती पण त्यांचाही संसार तसा गरिबीचाच होता. कमीत कमी, अगदी अत्यावश्यक तेवढ्या, वस्तू वापरत ते संसाराचा गाडा कसाबसा ओढत होते. फार दिवस तिथे राहणेही तसे अवघडच होते; पण वार्षिक परीक्षा होईपर्यंत तिथेच कसेबसे दिवस काढणे आवश्यक होते. शालेय अभ्यास व्यवस्थित चालला होता. त्यावेळी अभ्यासक्रमात सात विषय होते. एखाददुसरा अपवाद वगळता शिक्षकही सगळे मन लावून शिकवत; विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये त्यांना खराखुरा रस होता. महत्त्वाचे म्हणजे स्कॉलरशिपचे पाच रुपये दरमहा मिळू लागले होते. हा हा म्हणता इंग्रजी पहिलीचे ते वर्ष संपले. निकाल नेहमीप्रमाणे उत्तम लागला. पुढील वाटचालीचा मार्ग मोकळा झाला. सिन्नरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रावसाहेबांनी इंग्रजी पहिलीचे वर्ष काढले त्या काळातील एक अनुभव रावसाहेबांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. स्कॉलरशिप मिळण्याची पूर्वअट म्हणून त्यांनी या शाळेत प्रवेश घ्यायचे ठरवले खरे, पण तोवर शिक्षणखात्याच्या नियमानुसार प्रवेशाची मुदत संपून गेली होती. कोरडे नावाचे शाळेचे हेडमास्तर होते. त्यांनी रीतसर प्रवेशअर्ज भरून घेतला व परवानगीसाठी तो एज्युकेशन इन्स्पेक्टरकडे पाठवून दिला. ती परवानगी येऊन रावसाहेब प्रत्यक्ष शाळेत दाखल होईस्तोवर बराच कालावधी लोटला होता. दरम्यान वर्गाचा अभ्यासही खूप पुढे सरकला होता. इतर विषयांची रावसाहेबांना काहीच भीती नव्हती, कारण पुस्तके वाचून ते स्वतःच अभ्यास करू शकत होते; ते पण इंग्रजीत मात्र त्यांची चांगलीच अडचण झाली. त्यांना इंग्रजीचा गंधही नव्हता; साधी वर्णमालाही माहीत नव्हती. बाकीची मुले मात्र तोवर सोपे सोपे इंग्रजी वाचायला लागली होती; बऱ्याच शब्दांचे स्पेलिंगही त्यांना पाठ झाले होते; पहिलीच्या रीडरचे काही धडे शिकवूनही झाले होते. पायाच कच्चा असल्याने रावसाहेबांना वर्गातले काहीच समजत नसे. जिथे ते राहत होते त्यांचीही इंग्रजी अभ्यासाच्या दृष्टीने काही मदत होणे शक्य नव्हते. इंग्रजीचे शिक्षक घरी शिकवणी घेत. इंग्रजी येत नाही म्हणून ते रावसाहेबांचा वर्गात पाणउतारा करत. "माझ्या शिकवणीला येत जा” असे त्यांनी एकदा रावसाहेबांना स्पष्टच सांगितले. ती सूचना ऐकून रावसाहेबांना आनंद झाला. अजुनी चालतोची वाट... ४०