पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व त्या काळात ते खूप गरजेचे होते. इथे काम करणाऱ्यांना फारसे काही शिक्षण वा कसबही आवश्यक नसे. विड्या वळण्याचे काम घरी, दारी, कुठेही करता येई. त्यामुळे कोणालाही हा रोजगार मिळू शकायचा. विशेष म्हणजे यात महिला कामगार अधिक असत. अखिल भारतीय विडी उद्योग महासंघाचे संस्थापक देवकिसन सारडा म्हणतात, "या उद्योगाची त्या परिसरात मुहूर्तमेढ रोवणाऱ्यांमध्ये माझे वडील हे एक प्रमुख होते. मुंबई महापालिकेतही एकेकाळी खास विधवांसाठी म्हणून रस्त्यालगत राखीव गाळे ठेवले होते. ह्यांचा वापर अनेक विधवा विड्या वळण्यासाठी वा विकण्यासाठी करत. फौंटन पेन हे ज्याप्रकारे दौत व टाक यांचे एकत्रित आधुनिक रूप होते, त्याचप्रकारे विडी हे तंबाखू आणि चिलिमीचे एकत्रित आधुनिक रूप होते. पांडुरंग पाटील यांच्या पाडळी येथील घराचाही काही भाग माझ्या वडलांनी विडी कारखान्यासाठी भाड्याने घेतला होता. त्या परिसरात असे आमचे साठहून अधिक कारखाने होते व त्यात सुमारे दहा हजार कामगारांना दैनंदिन रोजगार मिळत होता. " त्यातलेच एक किसन तात्या. त्यांची राहण्याची जागा म्हणजे माडीवरची फक्त एक खोली होती. घरात तीनचार मुलेबाळे. विडी कारखान्यातून ते तंबाखू घरी आणत व घरातच विड्या बांधायचे काम करत. त्याशिवाय विड्यांची पाने कापण्याचे कामही ते घरीच करत. तशातच त्यांच्या तीन मुलांना देवी आल्या होत्या. त्या सगळ्याचा उग्र दर्प खोलीभर पसरलेला असे. त्यावेळी त्या परिसरात देवीची मोठीच साथ आली होती. अंगारे, धुपारे, मंत्र-तंत्र, भगताला बोलावून देवीची वाजत-गाजत बोळवण करणे वगैरे गावठी प्रकार देवीवरील उपचार म्हणून लोक करत. देवीची लस टोचून घ्यायची मात्र लोकांना फार धास्ती वाटायची. लस टोचणारे डॉक्टर गावात आले, की घाबरून लोक घरातून पळून जात, कुठेतरी लपून बसत. कान टोचणे, नाक टोचणे, मोठमोठ्या सुयांनी अंगावर गोंदवून घेणे वगैरे प्रकार हौसेने सर्रास करणारी ही माणसे देवीची एवढीशी लस टोचून घ्यायला का घाबरतात याचे रावसाहेबांना आश्चर्य वाटायचे; लोकांच्या अज्ञानाचा व अंधश्रद्धांचा रागही येई. अर्थात ते जिथे राहात होते त्या घरातलीच माणसे हे सगळे करायची, त्यामुळे नाइलाजाने रावसाहेबांनाही या सगळ्या विधींमध्ये सहभागी व्हावे लागे. एकीकडे आजारी मुलांचा सांभाळ करताकरताच किसनतात्यांची बायको घरकामही करायची, विड्या वळायचेही काम करायची. साफसफाई, स्वच्छता यांची तिला काही कल्पनाच नव्हती. यात तिचा दोष होता अशातला भाग नाही; पण या सगळ्या रोगट, कोंदट वातावरणात तिथे राहणे रावसाहेबांना असह्य झाले. परगावच्या शाळेत