पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग. गोरे - शरद पवार यांच्यासारखे राजकारणी होते, सहकार क्षेत्रातल्या व न्या क्षेत्रातल्या दिग्गजांपासून सर्वसामान्य शिक्षक शेतकऱ्यांपर्यंत समाजातल्या सर्व स्तरांवरचे सुहृद होते. यातील जवळजवळ सर्व मंडळी रावसाहेबांच्या महादेव मळा या श्रीरामपूर येथील घरी राहून गेलेली आहेत, अंगणातल्या पिंपळपारावर काव्यशास्त्रविनोदात तासन्तास रमलेली आहेत. श्रीरामपूर हे तसे तुलनेने आड बाजूला वसलेले गाव. अशा आडगावी राहत असल्यामुळेच कदाचित रावसाहेबांना मित्रसंपर्कासाठी पत्रे आवश्यक वाटली असणार. 'ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती' या संतवचनाचा प्रत्यय देणारा हा पत्रव्यवहार आहे. असा पत्रव्यवहार म्हणजे माझ्या मते एक साहित्यप्रकारच आहे. कधीकधी यांतील पत्रांना नर्म विनोदाची झालर आहे. उदाहरणार्थ, आपल्या एका पत्रात पु. ल. देशपांडे लिहितात, "मध्यंतरी कोल्हापूरला शंकरराव घोरपडे (शशिकलाताईंचे मामा) भेटले. मला गुळाची चव आहे, त्यावर त्यांचा ठाम विश्वास असल्यामुळे गुळाची ढेप भेट म्हणून घेऊन आले होते.” (खंड १, पृष्ठ ११९) कधीकधी प्रत्यक्ष बोलताना अवघडल्यासारखे वाटेल, अशा अनेक गोष्टी प्रांजळपणे पत्रातून सांगता येतात. पत्रातील एखादे वाक्यही व्यक्तीच्या पैलूवर प्रकाश टाकून जाते. उदाहरणार्थ, निवृत्त न्यायाधीश शिवगोंडा पाटील एका पत्रात लिहितात, "मला जरुरीपेक्षा व योग्यतेपेक्षा जास्त पेन्शन मिळते. " पैशावरून सतत कुरकुर करणारी, तो कितीही मिळाला तरी त्यात समाधान न मानणारी, अधिकासाठी वखवखणारी माणसे आपल्या अवतीभवती सगळीकडेच दिसतात. त्या पार्श्वभूमीवर न्या. पाटील यांची तृप्तीची भावना खूप आगळी वाटते. मुकुंदराव किर्लोस्कर यांचे एक पत्र प्रांजळपणाच्या संदर्भात इथे उद्धृत करण्यासारखे आहे. ते लिहितात : " ध्यासपर्व' चे प्रकाशन झाले त्या घटनेला आता जवळ जवळ २४ तास होतील, तरी एस. एम. जोशी सभागृहात काल पाहिलेले दृश्य अजून माझ्या डोळ्यांपुढून हलत नाही. या सभागृहाचे उद्घाटन झाल्यापासून असंख्य कार्यक्रमांना मी तेथे हजर राहिलो आहे, परंतु श्रोत्यांच्या प्रचंड उपस्थितीने अक्षरशः भरून वाहू लागलेला हॉल मी तेथे पूर्वी कधी पाहिला नव्हता. तुमच्या लोकसंग्रहाचा तो एकप्रकारे आरसाच होता. मी मात्र काहीसा अवघडलेल्या मन:स्थितीत तेथे बसलो होतो. 'प्रमुख पाहुण्यांचे' काडीमात्र कर्तव्य मी बजावले नव्हते आणि अजुनी चालतोची वाट... ३९८