पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्य वृद्ध स्त्रीला इंग्रज सरकारकडून आलेले ते पत्र होते. 'मागच्या वेळी नाशिकमध्ये आलो असताना मी आपले काम करू शकलो नाही. अमुक अमुक तारखेला मी पुन्हा नाशिकमध्ये असणार आहे. अमुक अमुक जागी आपण अमुक अमुक वेळेला मला त्या कामासंदर्भात भेटावे,' अशा आशयाचा मजकूर त्या पोस्टकार्डावर हाताने लिहिलेला होता. आणि खाली 'युवर मोस्ट ओबिडियन्ट सर्व्हन्ट' म्हणून इंग्रज कलेक्टरने सही केली होती! तत्कालीन इंग्रज प्रशासन किती जनताभिमुख होते आणि शासनाचा जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारीसुद्धा एखाद्या सामान्य नागरिकाप्रती किती संवेदनाक्षम असे याची साक्ष या एका साध्याशा पत्रानेसुद्धा पटते. 'फ्रीडम अॅट मिडनाइट' या भारताच्या फाळणीवरील व स्वातंत्र्यावरील विख्यात पुस्तकाचे लेखक डॉमिनिक लापिए (Lapierre) यांनीही असाच एक अनुभव लिहून ठेवला आहे. या पुस्तकाच्या पूर्वतयारीसाठी म्हणून ते भारतात आले पण बरेच महिने सगळी पाहणी करण्यात घालवल्यानंतर हे पुस्तक लिहायचे नाही, असेच त्यांनी ठरवले; कारण त्यासाठी आवश्यक ती पुरेशी मूळ कागदपत्रे (प्रायमरी सोर्सेस) त्यांना भारतात कुठेच सापडली नाहीत. हा संकल्प सोडून दिल्यानंतर एकदा लंडनमधे त्यांची लॉर्ड माउंटबॅटन यांच्याबरोबर योगायोगाने गाठ पडली. माउंटबॅटन यांना त्यांनी पुस्तकलेखनातली आपली अडचण सांगितली. माउंटबॅटन यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी आपल्या घरी बोलावले. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय म्हणून काम करत असतानाची सर्व व्यक्तिगत कागदपत्रे - पत्रे, रोजनिशा, भाषणांच्या प्रती, गाठीभेठींची टिपणे, वृत्तपत्रांतील कात्रणे इत्यादी - तिथे पद्धतशीरपणे क्रमश: जपून ठेवलेली होती. लापिए यांना मोठा खजिनाच तिथे सापडला व पुढे त्यांनी 'फ्रीडम अॅट मिडनाइट' लिहिले. भारताच्या फाळणीवरील व एकूणच त्या कालखंडावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकांमधे ते गणले जाते. पत्रव्यवहार हा अशा कागदपत्रांमधला एक महत्त्वाचा भाग असतो. स्वातंत्र्योत्तर काळामधे गेल्या पन्नास-साठ वर्षांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जे परिवर्तन झाले त्याचा ज्यांना अभ्यास करावासा वाटेल, त्यांच्या दृष्टीने 'संवादपर्व' चे पाच खंड हा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरू शकेल. - यथावकाश रावसाहेबांचे शिखर विस्तारत गेले. त्याचबरोबर मित्रवर्तुळही वाढत गेले. आपल्या सवयीनुसार रावसाहेब त्यांच्याशी आपुलकीचा पत्रव्यवहार करत गेले. यात ग. दि. माडगूळकर- पु. ल. देशपांडे यांच्यासारखी साहित्यिक मंडळी होती, बाबा आमटे मणीभाई देसाई यांच्यासारखे समाजसेवक होते, ना. साहित्यशारदेच्या प्रांगणात... ३९७