पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मागे लिहिलेच आहे. विजू हे त्याच वडाळकर बाईंचे चिरंजीव. सध्या मुंबईत राहून आपल्या पत्नी वालसा यांच्यासह ख्रिश्चन धर्माचे काम ते करत आहेत. वडाळकर कुटुंब आणि शिंदे कुटुंब यांची गेली पन्नास एक वर्षांची निकटची मैत्री आहे. रावसाहेबांच्या या दोन्ही दौऱ्यांचे संपूर्ण आयोजन विजू अब्राहम यांनीच केले होते. एकही दिवस शिंदे पती-पत्नींना हॉटेलात राहावे लागले नाही; त्यांचे युरोप- अमेरिकेतील वास्तव्य, जेवणखाण, प्रवास, गाठीभेटी, स्थलदर्शन या सगळ्यांची उत्तम व्यवस्था अब्राहम यांनी केली होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता हे दोन्ही विदेशदौरे शिंदे पती-पत्नींना उत्तम प्रकारे पार पाडता आले. प्रवासातील छोट्या छोट्या बाबींचे नियोजन करण्यात जो वेळ, पैसा व श्रम लागले असते त्या सगळ्यांची बचत झाली; एरवी भेटता आली नसती अशी अनेक स्थानिक माणसे भेटली; त्यांच्याशी मोकळ्या मनाने संवाद साधता आला. या सगळ्यांबद्दल, तसेच अब्राहम यांच्या कुटुंबीयांविषयी रावसाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. श्रीरामपूरच्या जर्मन मिशनमधील व नंतरच्या स्पॅनिश मिशनमधील सिस्टर्सचाही या संदर्भात गौरवाने उल्लेख केला पाहिजे. या मिशनचेही रावसाहेबांशी खूप जुने व प्रेमाचे संबंध आहेत व त्याची आठवण ठेवून त्यावेळी युरोपात परतलेल्या या सिस्टर्सनीही शिंदे पती-पत्नींचे युरोपात उत्तम आतिथ्य केले. एखादा देश समजून घेण्यासाठी अशा प्रकारची स्थानिक मंडळींची मदत खूप मोलाची ठरते. सर्वसामान्य प्रवासी सहसा कधी बघणार नाही अशा ठिकाणी जाता येते. खोलात जाऊन स्थानिक संस्कृतीचे विशेष जाणून घेता येतात. या जर्मन सिस्टर्सच्या व अब्राहम कुटुंबाच्या मनःपूर्वक सहभागामुळे रावसाहेबांचे हे दोन्ही विदेशदौरे खूपच आनंददायी व अर्थपूर्ण ठरले. प्रश्न आहे मूल्यांचा जून २००९ मधले. त्यानंतरचे रावसाहेबांचे पुस्तक म्हणजे जुलै २०११मध्ये प्रकाशित झालेले संवादपर्व. प्रत्यक्षात हे एक पुस्तक नसून प्रत्येकी सुमारे ५०० पानांच्या पाच खंडांमध्ये प्रकाशित झालेला हा रावसाहेबांचा पत्रव्यवहार आहे. इतक्या व्यापक प्रमाणात एखाद्याचा पत्रव्यवहार प्रकाशित होण्याचा हा मराठीतील बहुधा पहिलाच प्रकार असावा. म्हणूनच 'संवादपर्व' विषयी जरा विस्ताराने लिहिणे आवश्यक वाटते. सध्या एसएमएसचा जमाना आहे. आपला आशय कमीत कमी शब्दांमध्ये, किंबहुना कमीतकमी अक्षरांमध्ये लिहिण्याचा. Good night ऐवजी gn आणि See you ऐवजी Cu, Yes ऐवजी y आणि No ऐवजी | लिहिण्याचा. अर्थात या y साहित्यशारदेच्या प्रांगणात... ३९५