पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवळीवाड्यासारखा वाटला. हे सर्व लेखन खूप वाचनीय व महत्त्वाचे असले तरी ते काहीसे त्रोटक वाटते; वेगवेगळ्या छोट्या लेखांमध्ये विभागलेले असल्याने या लेखनाचा एकत्रित असा प्रभाव पडत नाही. विदेशातल्या अनुभवांवर आधारित एखादे स्वतंत्र पुस्तक रावसाहेबांनी लिहायला हवे होते असे वाटते. रावसाहेबांच्या आयुष्यात विदेशप्रवासाचा योग तसा खूप उशिरा आला. त्यांनी उच्चशिक्षणासाठी इंग्लडला जावे अशी कर्मवीरांची इच्छा होती व त्या दृष्टीने त्यांनी थोडेफार प्रयत्नही केले होते. त्याचा उल्लेख पूर्वी आलेलाच आहे. त्यांनी परदेशी जावे आणि तेथील समाजाचा किती विकास होतो आहे ते प्रत्यक्ष बघावे असे अण्णासाहेबांनीही त्यांना खूपदा सुचवले होते. पण वकिलीच्या किंवा इतर कामांच्या धबडग्यात रावसाहेबांच्या हातून ते झाले नाही. कदाचित त्यांनी विदेशप्रवासाला फारसे प्राधान्य दिले नाही असेही असू शकेल. १९९२ साली, म्हणजे वयाच्या चौसष्टाव्या वर्षी, रावसाहेब प्रथम परदेशी गेले. त्यानंतर २००१ साली, म्हणजे वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी, ते दुसऱ्यांदा परदेशी गेले. पहिला दौरा अमेरिकेचा तर दुसरा युरोपचा होता. दोन्ही प्रवास प्रत्येकी साधारण दोन महिन्यांचे होते व दोन्ही प्रवासांत त्यांच्या सौभाग्यवतीही बरोबर होत्या. हे दोन्ही प्रवास रावसाहेबांची एकूण जीवनदृष्टी विशाल करणारे होते. सर्वसामान्य जनतेची गरिबी, कुपोषण, निरक्षरता, बेकारी, रोगराई, वीज-पाणी- रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव वगैरे प्रश्न मिटवायचा आपण आपल्या देशात प्रयत्न करत आहोत, पण त्यात आपल्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही; उलट ज्या देशांमधील भांडवलशाहीचा आपण सतत इतका तिरस्कार करत आलो त्या देशांनी मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उत्तम प्रकारे सोडवले आहेत, हे विदेशप्रवासात त्यांना प्रकर्षाने जाणवले. जगातली कुठलीच समाजव्यवस्था परिपूर्ण नाही व माणसाची एकूण स्खलनशीलता लक्षात घेता तशी ती कधीही असू शकणार नाही हे उघड आहे; पण त्याचबरोबर अनेक मूलभूत प्रश्रांची पाश्चात्त्य जगाने सोडवणूक केली आहे व त्यापासून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे हे रावसाहेबांसारखा एकेकाळचा कडवा साम्यवादी आज मोकळ्या मनाने नोंदवतो. रावसाहेबांना एक वेगळीच दृष्टी देणारे हे दोन्ही दौरे आयोजित करण्यात विजू अब्राहम यांचा मोठा वाटा होता हे येथे नमूद करायला हवे. रावसाहेबांच्या वकिलीच्या दिवसांबद्दल लिहिताना डॉ. मेरी अब्राहम ऊर्फ वडाळकरबाई यांच्याविषयी अजुनी चालतोची वाट... ३९४