पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गरजवंतांना मदत केली. राजकारणात भाग घेतला, पण जेव्हा सत्तेचे राजकारण सुरू झाले तेव्हा त्यांनी स्वत:ला त्यापासून दूर ठेवले. रावसाहेबांचे चरित्र वाचकांना निश्चितच उद्बोधक ठरेल असा मला विश्वास वाटतो." रावसाहेबांचे आजवरचे जीवन 'ध्यासपर्व'मध्ये प्रामाणिकपणे उतरले आहे. म्हणून प्रस्तुत चरित्र लिहिताना 'ध्यासपर्व'मधील लेखनाचा वेळोवेळी उपयोग करणे अपरिहार्य ठरले आहे. त्या उद्धृतांवरूनही वाचकांना पुस्तकाच्या आशयाची कल्पना यावी. ध्यासपर्व प्रकाशित झाले त्याला आता नऊ-दहा वर्षे लोटली. या कालावधीत सातशे रुपये किंमत असूनही पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत. यावरून वाचकांना हे आत्मकथन किती भावले आहे हे जाणवते. 'ध्यासपर्व'नंतरचे रावसाहेबांचे पुस्तक आहे प्रश्न आहे मूल्यांचा. ते जून २००९ मध्ये प्रकाशित झाले. यातले बरेचसे लेख लोकसत्ता या दैनिकातील कवडसे या सदरात प्रकाशित झाले होते. वृत्तपत्रासाठी लिहिलेले असल्याने हे लेख काहीसे त्रोटक, वृत्तपत्रांच्या जाचक शब्दमर्यादेत बसणारे आहेत. शीर्षकातून सूचित झाल्याप्रमाणे नैतिक मूल्यांची गरज अधोरेखित करणारे हे लेख आहेत. यातले काही लेख मूल्यचर्चेत सहसा उल्लेख न होणाऱ्या बाबींविषयी आहेत. उदाहरणार्थ ध्वनिप्रदूषण. त्याविषयी एका लेखात रावसाहेब लिहितात : "ध्वनिप्रदूषणाचे रूप अक्राळविक्राळ होत आहे. ढोल, ताशे, बँड, ध्वनिक्षेपक, मोठमोठाले भयंकर फटाके, अॅटम बाँब, दारूकामातील आवाज हे तर कानठाळ्या बसवत आहेत. झोप मोडत आहेत. कित्येक मुलांच्या कानांच्या पडद्यावर विपरीत परिणाम करीत आहेत. भल्या पहाटे धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले ध्वनिक्षेपक सुरू होतात. प्रार्थनांच्या भेसूर अशा आवाजांनी लोकांच्या झोपा मोडतात. वातावरणातील नीरव शांततेचा भंग होतो. ईश्वराची प्रार्थना इतक्या कर्कश आवाजात व तीही ध्वनिक्षेपकावर कशासाठी करायची, हे त्या आवाज काढणाऱ्यांनाही कळत नसावे. ईश्वर-अल्ला, राम रहिम यांना त्या भयानक आवाजाने नक्कीच त्या मंदिर-मशिदीतून पळ काढावा लागत असेल." या पुस्तकातील शेवटचे काही लेख (३२ पाने) अगदी वेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे त्यांचा संबंध मूल्यांशी आहेच, पण त्यांतील आशय रावसाहेबांना अमेरिका व युरोपच्या दौऱ्यादरम्यान आलेल्या अनुभवांवर आधारित आहे. आपल्याकडे अनेक जणांची प्रवृत्ती पाश्चात्त्यांना अनैतिक ठरवण्याची आणि त्याचवेळी आपल्या देशाच्या नैतिकतेचा टेंभा मिरवण्याची आहे. अशा मंडळींचे डोळे उघडणारे, पाश्चात्त्यांनी ऐहिक प्रगतीच्या जोडीनेच नैतिकताही कशी जपली अजुनी चालतोची वाट... ३९२