पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सातत्याने केलेला आग्रह या आत्मवृत्तलेखनाला मुख्यतः प्रेरणादायी ठरला. रावसाहेब म्हणतात, "स्वभावतः मी गप्पाष्टकांत आणि भाषणांत वाहवत जाणारा. मित्रमंडळींत तासन्तास गप्पा मारणे मला आवडते. लिहिणे मला आवडत नाही असे नाही, पण गप्पा जशा सहजासहजी होत राहतात तसे हातून लिखाण होत नाही." या व अशा इतरही काही अडचणींमुळे 'ध्यासपर्व'चे लेखन काहीसे रेंगाळले पण जेव्हा झाले तेव्हा त्यांच्या प्रदीर्घ जीवनप्रवासाचा बऱ्यापैकी प्रत्यय देणारे झाले. मनोगतात रावसाहेब पुढे म्हणतात : 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे,' ही उक्ती मला भावते. केवळ वाचाळतेवर माझा विश्वास नाही. हल्ली वाचाळ व तथाकथित विद्वान पंडितांचे अमाप पीक आलेले दिसते. बोलण्यात (पैसे घेऊन) भल्या भल्या गोष्टी, तत्त्वज्ञान; पण वर्तन मात्र विसंगत. याचा विषाद वाटतो. सत्ता, पदे स्वीकारण्यापासून मी स्वत:ला जाणीवपूर्वक बाजूला ठेवले. याचा अर्थ सत्ता राबविण्याला माझा विरोध आहे असे नाही. पण असे पद सेवेसाठी स्वीकारले जावे, त्यातून लोककल्याण साधावे, स्वतःचा उत्कर्ष नव्हे. 'देतो तो देव - राखतो तो राक्षस.' अशा देवत्वाची कास धरायला पाहिजे. सत्तेबाहेर राहूनही आपण सेवाभावी चांगले जीवन जगू शकतो हादेखील माझा विश्वास. अंतर्बाह्य नीतिमत्ता आणि स्वच्छता पाळली पाहिजे हा माझ्या ध्यानीमनीचा ध्यास मी सतत कृतीत जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ध्येयाच्या खंबीर पायावर उभे राहिले म्हणजे जीवनाला आणि कार्याला उजाळा मिळतो असा माझा विश्वास आहे. या विश्वासानेच मी ध्येयाचा ध्यास घेऊन इतकी वर्षे वाटचाल करत चाललो." पुण्याच्या लॉ कॉलेजचे प्राचार्य आणि प्रख्यात कायदेपंडित डॉ. सत्यरंजन साठे यांची रसाळ प्रस्तावना 'ध्यासपर्व' ला लाभली आहे. दोघांचा स्नेह खूप जुना, पार विद्यार्थिदशेपासूनचा. त्याची साक्ष पटवणा-या या स्तावनेत डॉ. लिहितात: " रावसाहेब हे एक काहीही छक्के पंजे मनात नसलेले गृहस्थ आहेत. या अनुभवकथनात स्वत:ची अवास्तव स्तुती नाही, तसेच नाटकी विनयही नाही. जे त्यांनी अनुभवले आणि जे त्यांना भावले, ते त्यांनी लिहिले. रावसाहेब राजकारणापासून दूर झाले याचे एक कारण म्हणजे त्यांची ऋजुता. या माणसाला राजकारणातले डावपेच जमणारे नाहीत. रावसाहेबांचे कौटुंबिक जीवन सुखी आहे. श्रीमंती ही केवळ पैशांची नसते. ती माणसाच्या प्रेमाची असते. ते प्रेम रावसाहेबांना उदंड लाभले आहे. कुटुंबीयांचे, मित्रांचे व व्यावसायिकांचेही प्रेम त्यांना लाभले आहे. एक समाधानी जीवन रावसाहेब जगत आहेत. दु:खितांचे अश्रू त्यांनी पुसले. साहित्यशारदेच्या प्रांगणात... ३९१