पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चरित्र आणि चारित्र्य या पुस्तकाचे वेगळेपण डॉ. र. बा. मंचरकर यांनी प्रस्तावनेत मोठ्या मार्मिक शब्दांत उलगडून दाखवले आहे. ते लिहितात : " एखाद्या संकल्पित ग्रंथाचे योजनाबद्ध भाग म्हणून या लेखांचे लेखन झालेले नाही. प्रसंगोपात्त निमित्ताने ते झालेले आहे. षष्ट्यब्दीपूर्ती, अमृतमहोत्सव असे समारंभ, त्या निमित्ताने प्रसिद्ध होणारे गौरवग्रंथ, स्मरणिका, क्रांतिदिनासारख्या विशेष दिनाच्या निमित्ताने निघणारे विशेषांक यांसाठी हे लेखन झालेले आहे. काही लेख श्रद्धांजली म्हणूनही लिहिले गेले आहेत. कर्तृत्ववान व्यक्तींविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे प्रसंग आहेत. त्यांच्या जीवनकार्याची सडेतोड चिकित्सा किंवा उणे-अधिक शोधणे अशा वेळी अनुचित ठरणारे असते. त्यामुळे या लेखनाला साहजिकच गौरवगानाचे स्वरूप आलेले आहे. या धुरंधर आणि कर्तृत्वशाली पुरुषांविषयीच्या जातिवंत जिव्हाळ्याने हे लेख ओलावलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचे समतोल विवेचन होण्याऐवजी बऱ्याच वेळा त्यात गौरवाची भावना अधिक प्रमाणात मिसळल्यासारखी वाटते. परिचितांची चरित्रचित्रे लिहिताना लेखक एक प्रकारे आपले आत्मचरित्रच लिहीत असतो. 'मी आणि मला दिसलेले जग' असे श्री. म. माटे यांनी आपल्या आत्मवृत्ताला पर्यायी नाव दिलेले आहे. या दोन्हींनी मिळूनच माणसाचे जीवन बनते. त्यामुळे रावसाहेबांनी येथे दिसलेल्या जगावर आणि भेटलेल्या माणसांवर भर दिला असला तरी त्यातून ते व्यक्त झाल्याशिवाय कसे राहतील? सत्यघटनांवर आधारलेला योग्य व संबद्ध तपशील निवडून त्यातून पर्यावरणासह व्यक्तिजीवनाची प्रमाणबद्ध चित्राकृती निर्माण करण्यात चरित्रचित्राचे यश सामावलेले असते. सत्याची बंधने असली तरी चरित्रनायकाच्या जीवनाचे मर्मस्थान हेरून त्याभोवती आवश्यक त्याच तपशिलाची उभारणी करण्याचे स्वातंत्र्य रावसाहेबांनी घेतले आहे. सत्यही कल्पितापेक्षा अद्भुत आणि कादंबरीपेक्षा वेधक असू शकते. त्यामुळे त्यांनी घडविलेली व्यक्तिदर्शने आल्हाददायक झाली आहेत. सत्य ज्यावेळी आपल्या अंगोपांगांसकट सहजपणे आविष्कृत होते त्यावेळी त्याला एक स्वयंभू सौंदर्य प्राप्त होते. प्रतीतिगोचर होणाऱ्या भावसत्यामुळेच या लेखनाला वजन चढते. त्यात इतर कलाद्रव्ये असोत-नसोत ते आपल्या प्रांजळपणामुळेच कलारूप पावते. 'आर्ट इज सिन्सिरिटी' या वचनाचा प्रत्यय येथे येतो." ध्यासपर्व हे रावसाहेबांचे ६०८ पानांचे आत्मकथन जानेवारी २००५ मध्ये प्रकाशित झाले. त्यांचे ते आजवरचे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक मानता येईल. पुस्तकाच्या सुरुवातीला 'मनोगत' मध्ये म्हटल्याप्रमाणे भाऊसाहेब थोरात यांनी अजुनी चालतोची वाट... ३९०