पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकाशक पुण्याचे अमेय प्रकाशन हे आहेत. पृष्ठसंख्या तशी कमी असूनही दोन्ही पुस्तके पुष्ठा बांधणीची आहेत. दोन्ही पुस्तकांचे संपादन अहमदनगर येथील ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. प्रा. रत्नाकर बापूराव मंचरकर यांचे असून त्यांनीच दोन्ही पुस्तकांना विवेचक व मर्मग्रही प्रस्तावनाही लिहिल्या आहेत. शिक्षण आणि समाज या पुस्तकातील विचार प्रस्तुत पुस्तकात अधूनमधून उद्धृत केलेलेच आहेत. तरीही पुस्तकाची एक झलक म्हणून चारित्र्यहीन शिक्षण: एक सामाजिक पाप या लेखातील हा काही भाग : "शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे हा विचार कर्मवीर भाऊराव पाटलांना भावला. रयत शिक्षण संस्थेचा जन्मही याच विचारातून झाला. ग्रामीण भागातील दलितांमधील दलित मुले संधी मिळाल्यास विद्यापीठात नाव काढू शकतात हे भाऊरावांनी सप्रयोग सिद्ध केले. गोरगरिबांच्या व दलितांच्या आत्मविश्वासाची ज्योत त्यातून पेटली. 'Show to the world that there is nothing in the world which a Negro cannot do,' असे डॉ. कार्व्हर या जगप्रसिद्ध निग्रो शास्त्रज्ञाने व शिक्षणतज्ज्ञाने आपल्या निग्रो बांधवांना सांगितले. त्याच तऱ्हेचा मंत्र दलित व गरीब समाजातील विद्यार्थ्यांना कर्मवीरांनी दिला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या उपस्थितीत २४ ऑक्टोबर १९३७ रोजी सेवेच्या व्रताचा 'शपथविधी' रयत शिक्षण संस्थेत पार पडला. 'सामाजिक काम हे अक्रोडाच्या झाडासारखे आहे. बारा वर्षांनी त्याला फळे लागतात. पण भाऊरावांच्या कामाला त्याच्या आधी फळे आली,' असे उद्गार त्यावेळी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काढले. महर्षी शिंदे यांच्या उद्गारानंतर बारा वर्षांची अनेक तपे गेली, तरीही अक्रोडाच्या फळासारखी अपेक्षित फळे पुन्हा लागल्याचे दिसत नाही. प्राथमिक शिक्षणापासून खऱ्या विद्याभ्यासाची आणि संस्कारशीलतेची सुरुवात होते. निकोप प्रवृत्ती आणि उघडी दृष्टी घेऊन मुले आलेली असतात. जगाची खूप काही माहिती मिळवावयाची असते. जिज्ञासा व ज्ञानलालसा असते. ही ज्ञानलालसा भागवायला शिक्षकही ज्ञानी पाहिजे. तथापि आपली प्राथमिक शिक्षकांची निवडच मुळी अगदीच जुजबी कसोट्यांवरची असते. आपल्या प्राथमिक शिक्षणाइतकी आबाळ शिक्षणाच्या कोणत्याही स्तरावर नसेल. आपण प्राथमिक शिक्षणाची एक प्रकारे 'भिकार' अवस्था करून टाकली आहे. शाळेत जायला मुले उत्सुक नसतात. सुट्टी मिळाली की त्यांना खूप आनंद होतो. हाच आपल्या शिक्षणपद्धतीचा मोठा पराभव आहे. या प्राथमिक शाळांना 'जीवन शिक्षण मंदिर' असा बोर्ड लावलेला असतो, याच्याइतका दुसरा मोठा विनोद नाही." साहित्यशारदेच्या प्रांगणात... ३८९