पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पण या सगळ्या आनंदाला दुःखाचीही एक किनार होती. कारण देवठाणची शाळा फक्त मराठी शाळा होती आणि सरकारी नियमांनुसार इंग्रजी शाळेत पहिलीत प्रवेश घेतला तरच ही स्कॉलरशिप रावसाहेबांना मिळणार होती. तसे पाहिले तर यात मराठी शाळेत काढलेले पाचवीचे एक शालेय वर्ष वाया जाणार होते; पण भविष्याच्या दृष्टीने इंग्रजी शाळेत जाणे महत्त्वाचे ठरणार होते. जड अंत:करणाने त्यांनी देवठाणचा निरोप घेतला. पाडळीपासून बारा-चौदा मैलांवरील सिन्नर इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. इंग्रजी पहिलीत. सिन्नर हे तसे इतिहासकालीन गाव आहे. याचे प्राचीन काळातील नाव श्रीनगर होते. काही यादवकालीन ताम्रपटांत सिन्नरचा उल्लेख सिंदर किंवा सिंदीनेर असाही केल्याचे आढळते. पेशवाईत अमृतराव देशमुख यांनी या गावाला तटबंदी घातली, नदीवर बंधारा बांधला. देशमुखवाडा म्हणून प्रसिद्ध असलेली गावातली भव्य वास्तूही त्यांनीच बांधलेली. त्यावेळी हे व्यापारउदिमाचे मोठे गाव होते; पण पुढे मात्र तो व्यापार खूपच कमी झाला. सिन्नरमधील सर्वांत महत्त्वाची वास्तू म्हणजे तेथील किमान हजार वर्षे पुरातन असे गोंदेश्वराचे मंदिर. शिलाहार यादव शैलीतील काळ्या दगडाचे हे मंदिर खूप सुंदर आणि भव्य आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी प्रशस्त मोकळी जागा आहे, त्यापलीकडे भक्कम भिंत आहे. एका बाजूला तटबंदीच्या पलीकडे मोठा तलाव आहे. आज हे मंदिर गावात आले असले आणि अवतीभवती दुकानांची व माणसांची बरीच वर्दळ दिसत असली तरी त्यावेळी मात्र ते गावाबाहेर उघड्या माळावर असे होते. वस्तीपासून लांब असल्याने देवळाचा परिसर खूप निवांत असे. देवळात थंडगार, प्रसन्न वातावरण असे. सिन्नरला रावसाहेबांची राहण्याची सोय दादांनी किसनतात्या नावाच्या मूळच्या च्या पाडळीतल्याच एका गृहस्थाकडे केली होती. मुलाला ठेवून घेतल्याच्या बदल्यात दादा त्यांना अधूनमधून धान्य देत. अशा व्यवहारांमध्ये रोख पैसे द्यायची त्यावेळी पद्धत नव्हती, रोकड अशी लोकांकडे फारशी नसायचीच; देवाणघेवाण खूपदा वस्तूंच्या रूपातच व्हायची. किसनतात्या एक गरीब विडीमजूर होते व अधूनमधून मिळणारे धान्य हीदेखील त्यांना मदतच होती. विडीव्यवसाय त्या परिसरातला एकमेव व्यवसाय होता. त्या काळाच्या चौकटीत विचार केला तर विडीव्यवसायाचे महत्त्व खूपच होते. अकोले, संगमनेर व सिन्नर हे तिन्ही तालुके तसे नापीक. सगळा पठारी भाग आणि दुष्काळी. त्यामुळे शेतकरी सदैव कर्जबाजारी. त्यांना त्यातल्यात्यात आधार होता तो विडी उद्योगाचा. एकूणच विडी उद्योगाची रोजगार निर्मितीची क्षमता खूप होती अजुनी चालतोची वाट... ३८