पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कळला नाही, तर फोनवरून तो घ्यायला अॅड. रावसाहेब विसरत नाहीत. त्यावेळी प्राधान्यक्रमाने माझ्या पत्नी व सुनेविषयी विचारपूस करायलाही ते कदापि विसरत नाहीत. हे केवळ औपचारिकतेतून नव्हे, तर त्यांच्या मूलप्रकृतीतून येत असते. स्त्रीविषयी कमालीचा आदर हा त्यांचा स्थायिभाव आहे. कै. तात्यासाहेब शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांना भेटायची अॅड. रावसाहेबांची मनातून तीव्र ओढ होती. परंतु स्वभावातील उपजत विनम्रता आणि संकोच यांमुळे त्यांची ही भेट टळत आली होती. रावसाहेबांच्या मनातली ओढ पाहून मी एकदा तात्यासाहेबांसमोर भेटीविषयी प्रस्ताव मांडला. त्यांनी तत्काळ माझ्यामार्फत भेट निश्चित केली. खरे सांगायचे तर या भेटीस मी केवळ निमित्तमात्र म्हणून मध्यस्थ होतो. परंतु अॅड. रावसाहेबांच्या व्यक्तित्वातील 'कृतज्ञ माणसा' ला या भेटीचे श्रेय मला देण्याचे अद्यापही विस्मरण होत नाही. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि 'सकाळ'च्या नाशिक आवृत्तीचे तत्कालीन संपादक श्री. उत्तम कांबळे यांच्या भेटीच्या संदर्भातही असेच प्रत्यंतर आले. नाशिकला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अॅड. रावसाहेब आले होते. श्री. कांबळे यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या 'ध्यासपर्व' या आत्मकथनाची प्रत अभिप्रायार्थ त्यांना द्यावयाची होती. संकोची वृत्तीच्या अॅड. रावसाहेबांना याही भेटप्रसंगी माझा कांबळेंशी असलेला पूर्वपरिचय म्हणून माझी उपस्थिती आवश्यक वाटली. आम्ही उभयता 'सकाळ'च्या कार्यालयात कांबळे यांना भेटलो. रावसाहेबांचा परिचय देताना कांबळे म्हणाले, "पाटीलसर, मी रयतचा विद्यार्थी आहे. ते मला ओळखत नसणे स्वाभाविक आहे, पण मी त्यांना ओळखतो." आपल्या संपादकीय व्यस्ततेतही श्री. कांबळेंनी या भेटीसाठी वेळ देऊन अॅड. रावसाहेबांविषयी आदर व्यक्त केला. भेट संपून बाहेर पडताच न राहवून मी अॅड. रावसाहेबांना म्हणालो, 'साहेब, पाहिले ना, स्वत:ला विसरून माझ्यासारख्याला मोठेपण देण्यातील तुमचा मोठेपणा!' यावर काहीही भाष्य न करता ते फक्त निर्मळपणे हसले. " ( प्रेरणापर्व, पृष्ठे ६१ ते ६८) साहित्यसृष्टीत अनेक वर्षे वावरूनही आणि स्वत: ही लेखन करावे अशी अंतर्यामी ओढ असूनही रावसाहेबांच्या हातून २००१ पर्यंत स्वतःचे लेखन असे फारसे काहीच झाले नाही. शिक्षण आणि समाज हा अकरा वैचारिक लेखांचा संग्रह आणि चरित्र आणि चारित्र्य हा दहा व्यक्तिचित्रांचा संग्रह ही त्यांची पहिली दोन पुस्तके ऑगस्ट २००१ मध्ये एकदमच प्रकाशित झाली. शिक्षण आणि समाज १५१ पानी आहे, तर चरित्र आणि चारित्र्य १९५ पानी आहे. दोन्ही पुस्तकांचे अजुनी चालतोची वाट... ३८८