पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अगदी गंभीरपणे म्हणालो, 'अहो, आधीच तुम्ही मुलीचे बाप. लग्नाला बरेच पैसे खर्च झाले असणार तुमचे निदान एवढा तरी खर्च तुमचा वाचवतो!' रावसाहेब नेहमीप्रमाणे मनमोकळेपणाने हसले. स्वागताच्या सगळ्या उपचारांपेक्षा या हास्याने केलेले स्वागत हे मला अधिक मोलाचे वाटले. अण्णासाहेबांच्या घरच्या एका कार्यात असाच मी गेलो होतो. कस्तुरबा मंगल कार्यालयात झालेल्या लग्नसमारंभाला अक्षरशः जत्रेसारखी गर्दी लोटली होती. यशवंतराव चव्हाण, शरद पवार अशी बडी बडी मंडळी लग्नाला उपस्थित राहिलेली. त्या गर्दीत मी कोठेतरी अंग चोरून उभा होतो. रावसाहेबांनी मला पाहिले मात्र, लगेच हसतमुखाने स्वागत तर केलेच, पण लगेच हात धरून पुढे नेऊन बसवले. मोठ्या मंडळींच्या गर्दीतही आपल्या लहान स्नेह्याला ते कधी विसरणार नाहीत." 'अनुष्टुभ' या प्रतिष्ठित वाङ्मयीन नियतकालिकाचे माजी संपादक प्रा. गो. तु. पाटील रावसाहेबांची मुख्य ओळख 'एक माणूसनिष्ठ माणूस' ही आहे असे मानतात. एका व्यक्तिगत कामासाठी ते रावसाहेबांना प्रथम भेटले. त्यांनी लिहिले आहे : " एका आठवड्याने मी अॅड. रावसाहेबांच्या भेटीस श्रीरामपूरला महादेव मळ्यात गेलो. माझ्या कौटुंबिक समस्येच्या संदर्भात सारा तपशील त्यांनी आस्थेने ऐकून व नोंदवून घेतला. 'अनुष्टुभ' या साहित्य - सांस्कृतिक चळवळीविषयी आस्थापूर्वक सर्वांगांनी माहिती करून घेतली. घरात जाऊन 'अनुष्टुभ' च्या आजीव वर्गणीचा चेक लिहून आणला नि माझ्या हाती मोठ्या विनम्रतेने दिला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा अनुभव अपूर्वच होता. कारण आजीव नव्हे तर वार्षिक वर्गणीदार होण्याची विनंती करूनही अनेकदा तथाकथित साहित्यिक, साहित्यप्रेमी म्हणून मिरविणाऱ्या महाभागांकडून मिळालेल्या नकाराच्या अनुभवांची श्रीमंती माझ्यागाठी बरीच होती. त्या पार्श्वभूमीवर हा अनुभव सुखद धक्का देणारा होता. विशेष हे की, या प्रसंगीच्या अॅड. रावसाहेबांच्या बोलण्यात वा वागण्यात उपकारकर्त्याची भावना मला दूरान्वयानेही जाणवली नाही. कालौघात माझे कौटुंबिक काम अॅड. रावसाहेबांनी केव्हा नि कसे मार्गी लावले ते मला कळलेही नाही. त्यांनी त्याचा कधी उच्चारही केला नाही. एवढे मात्र खरे, की या निमित्ताने आलेल्या संबंधातून केवळ आम्हां उभयतांचेच नव्हे, तर उभयतांच्या कुटुंबाचेही ऋणानुबंध जुळून आले. येवल्यावरून अॅड. रावसाहेब कुठे जात येत असताना त्यांची पावले 'कृतज्ञता' या आमच्या निवासाकडे वळली नाहीत असे बहुधा घडले नसावे. भेटीत लक्षणीय अंतर पडले वा समाचार साहित्यशारदेच्या प्रांगणात... ३८७