पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उंचीच्या पारिजातकाच्या रोपानं माझं लक्ष वेधून घेतलं. दुसरे दिवशी निघताना मी ते लोभस रोपटं बरोबर घेतलं आणि रावसाहेबांच्या हाती दिलं. रावसाहेबांनी मला ते गंगाच्या समाधीजवळ रोपण्यास सांगितलं. रोपटं वाढलं. त्याचं झाड बनलं. पारिजातकाच्या शुभ्र सुगंधी फुलांचा सडा आता गंगाची समाधी झाकून टाकत असतो. रावसाहेबांना फार फार कृतज्ञ वाटलं." साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि आपल्या खुसखुशीत विनोदाने आबालवृद्धांना हसवणारे द. मा. मिरासदार यांनी लिहिले आहे : - " रावसाहेब शिंदे यांची प्रथम भेट झाली तो दिवस मला अजून चांगला आठवतो. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि मी - असा आम्हा तिघांचा कथाकथन कार्यक्रम त्यावेळी ठिकठिकाणी होत होता. अशाच एका दौऱ्यात श्रीरामपूरला कार्यक्रम ठरला. सभागृह रसिक श्रोत्यांनी भरलेले होते. भारतीय बैठकीच्या या गर्दीत अगदी समोरच गावातील काही प्रतिष्ठित मंडळी बसली होती. त्यात एक जरासे स्थूल वाटणारे, गौर वर्णाचे, डोक्यावर टक्कल असलेले, हसतमुख मुद्रेचे प्रौढ गृहस्थ बसलेले दिसले. कार्यक्रम रंगला तसे सर्व सभागृह हास्याच्या लाटांनी उसळत होते, पण हे गृहस्थ खूपच हसत होते. काही प्रौढ माणसे हसू आले तरी ते दाबतात. आपल्या मोठेपणाला खदखदून हसणे शोभत नाही असे त्यांना वाटते. त्यांना तो पोरकटपणा वाटत असावा. पण हे गृहस्थ मात्र अगदी मुक्तपणाने खदखदून हसत होते. चांगल्या विनोदाला दाद देत होते. कार्यक्रम संपल्यावर आमची प्रतिष्ठित श्रोतेमंडळींशी ओळख करून देण्यात आली. या प्रौढ रसिकाची ओळख करून देताना कार्यकर्ते म्हणाले, 'हे रावसाहेब शिंदे. इथले प्रसिद्ध अॅडव्होकेट. नामदार अण्णासाहेब शिंदे यांचे बंधू. ' रावसाहेबांची पहिली ओळख ही अशी एक रसिक म्हणून झाली. पुढे रावसाहेबांच्या अनेक वेळा गाठीभेटी झाल्या. परिचयाचे रूपांतर स्नेहात झाले. हा स्नेहही खूप दृढ होत गेला. पण प्रथम भेटीतले ते लहान मुलासारखे निरागसपणे खदखदून हसणारे रावसाहेब आजही मला चांगले आठवतात. त्यांच्या मुलीचे लग्न पुण्यातच आनंद मंगल कार्यालयात झाले. लग्नाला अक्षरशः हजारो माणसे लोटलेली होती. रावसाहेब स्वतः प्रवेशद्वारावर स्वागताला उपस्थित होते. मला त्यावेळची एक गंमत आठवते. आम्ही पतिपत्नी या लग्नाला रिक्षा करून गेलो. रिक्षा कार्यालयाजवळ थांबल्यावर आम्ही उतरलो. मी रिक्षावाल्याला पैसे देऊ लागलो. त्या गर्दीतही रावसाहेबांचे आमच्याकडे लक्ष गेले. ते गडबडीने आमच्या रिक्षाजवळ धावत आले आणि म्हणाले, 'थांबा थांबा, मी देतो पैसे.' मी अजुनी चालतोची वाट... ३८६