पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारखाना कसा सुरू केला ?" हाच विषय दिला. अकरावीपासून एम.ए., एम. एस्सी. पर्यंतचे झाडून सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि श्रीरामपुरातील आपले खूप सारे स्नेहीजन व्याख्यानाला उपस्थित राहतील याची तजवीज केली. काहीशा गांगरलेल्या मन:स्थितीतच भाऊंनी बोलायला सुरुवात केली. पण जसजसे ते कारखान्याची जन्मकथा सांगू लागले तसतसे व्याख्यान रंगत गेले. देहभान हरपून श्रोते ती प्रेरणादायी कहाणी, एका सर्वसामान्य शेतकऱ्याची संघर्षगाथा ऐकत होते. तब्बल तीन तास तो कार्यक्रम चालला आणि कित्येक दिवस ते व्याख्यान चर्चेचा विषय बनले होते. वाचनसंस्कृती वाढावी म्हणून रावसाहेबांनी शर्थीचे प्रयत्न केले. 'आधी केले, मग सांगितले' या न्यायाने स्वतः उत्तम पुस्तके विकत घ्यायला सुरुवात केली. वकिलीशी संबंधित पुस्तके तसे ते पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातून मागवतच असत; पण मात्र ज्याला साहित्यिक पुस्तके म्हणतात तीही ते आवर्जून विकत घेऊ लागले. आज त्यांच्या घरी स्वतःचे असे सुसज्ज ग्रंथालय आहे. रयत शिक्षण संस्थेतही विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. वेगवेगळ्या साहित्यिकांची व्याख्याने ते आयोजित करत. ग्रंथालयाकडे चांगल्या पुस्तकांची शिफारस करत. रयतच्या शाळा कॉलेजेसनी वेगवगळ्या नियतकालिकांचे वर्गणीदार व्हावे अशीही त्यांची इच्छा असे. नुसती इच्छा व्यक्त करून ते थांबत नसत, तर त्या दृष्टीने नेटाने पाठपुरावाही करत. रावसाहेबांशी ज्यांचे मैत्र जुळले अशा काही साहित्यिकांनी त्यांच्याविषयी मनापासून लिहिले आहे आणि त्यातून रावसाहेबांच्या व्यक्तित्वाच्या वेगवेगळ्या बाजूंवर प्रकाश पडतो. उदाहरणार्थ, ज्यांनी आवर्जून कुमारवयीन मुलांसाठी संस्कारदायी साहित्य लिहिले ते 'साधना' परिवारातील राजाभाऊ मंगळवेढेकर लिहितात : - "गंगा नावाची त्यांची एक आवडती, लाडकी गाय होती. गंगेचं पावित्र्य आणि पुण्यमयता रावसाहेबांना तिच्यात भेटलेली. गंगा घरी आली. घरही सुख- समृद्धीनं भरून गेलं. रावसाहेबांची गंगावर आईसारखीच श्रद्धा होती. कालमानानं गंगा वृद्ध झाली. थकली - भागली आणि पाच-सहा वर्षांपूर्वीच ती गेली. रावसाहेबांनी महादेवमळ्यातल्या आपल्या राहत्या घराच्या दरवाज्यापुढेच गंगाची मातीची समाधी तयार केली! त्या काळातच मी त्यांच्याकडं गेलो होतो. त्यावेळी रावसाहेब गंगाच्याच गोष्टी सांगत होते. गुणवर्णन करीत होते. आवर्जून त्यांनी मला गंगाची समाधी दाखवली. मी त्यांच्याकडून प्रवरानगरला गेलो. तिथल्या एका वीतभर साहित्यशारदेच्या प्रांगणात... ३८५