पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टाइम मध्ये) होत असते. वक्तृत्वातील हा थेटपणा व जिवंतपणा आणि त्यातून निर्माण होणारी एक प्रकारची नाट्यपूर्णता रावसाहेबांना नेहमीच भावत आलेली आहे. विशेषत: ग्रामीण भागात लेखणीपेक्षा वाणीतून प्रबोधन अधिक चांगले होऊ शकते असा त्यांचा अनुभव आहे. चळवळीच्या काळात व नंतरही समाजकारणात त्यांनी अक्षरशः हजारो भाषणे दिली असतील. ज्यांचे भाषण ऐकायला लोक आवर्जून जातात आणि त्यामुळे जे खऱ्या अर्थाने गर्दी खेचणारे ( क्राउड-पुलर ) आहेत अशा आजच्या महाराष्ट्रातील फार थोड्या वक्त्यांमध्ये रावसाहेबांचा समावेश होतो. विशेष म्हणजे ते स्वतः कधीच कुठल्या व्याख्यानाचे (वा लेखनाचेही) मानधन घेत नाहीत; पण इतर आमंत्रित वक्त्यांना मात्र ते भरघोस आणि सन्मानपूर्वक दिले जाईल यांची दक्षता घेतात. श्रीरामपूर येथील नगरपरिषदेने आयोजित केलेल्या डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती व्याख्यानमालेत रावसाहेबांनी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, बापूसाहेब काळदाते, माधवराव गडकरी, शरच्चंद्र गोखले, शरद जोशी, डॉ. श्रीकांत जिचकार, मुकुंदराव किर्लोस्कर, डॉ. नरेंद्र जाधव, द. मा. मिरासदार, राम प्रधान, बाबासाहेब पुरंदरे इत्यादी दिग्गजांना आमंत्रित केले. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी अशी त्यांची व्याख्याने आम जनतेला ऐकायला मिळाली. रावसाहेब कसबे, ना. ग. गोरे व ग. प्र. प्रधान यांचीही व्याख्याने त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांत व श्रीरामपूर शहरात आयोजित केली. डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती व्याख्यानमालेला आज मोठी प्रतिष्ठा लाभलेली आहे. म्हणूनच माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही या व्याख्यानमालेत भाषण दिले. एक उत्तम उदाहरण जे रुढार्थाने वक्ते नाहीत पण ज्यांनी आयुष्यात खूप वेगळे असे काही करून दाखवले आहे, त्यांना रावसाहेब आवर्जून व्यासपीठ उपलब्ध करून देतात. याचे पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव कासार येथील भाऊदादा पाटील राजळे. कम्युनिस्ट चळवळीत असताना रावसाहेबांचा व त्यांचा संबंध आला होता व त्यांनी पक्षासाठी सभा आयोजित करण्यात बरीच मदतही केली होती. जेमतेम चार बुके शिकलेल्या या एका सामान्य शेतकऱ्याने १९७० ते १९७७ अशी सात वर्षे अक्षरश: रक्ताचे पाणी करून श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना उभारला. त्यातूनच पुढे विद्यालये- महाविद्यालये उभारली आणि अहमदनगर जिल्ह्यातील या अत्यंत मागासलेल्या परिसराचा कायापालट करून दाखवला. रयतच्या बोरावके महाविद्यालयात रावसाहेबांनी त्यांना व्याख्यानासाठी पाचारण केले. आधी भाऊंनी खूप विरोध केला; 'मी साधा शेतकरी, मी काय कॉलेजात भाषण करणार ? " असे म्हणत. पण रावसाहेबांनी आग्रह धरला. 'मी साखर अजुनी चालतोची वाट... ३८४