पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोविंदबागेत निवडक आमंत्रितांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वत: शरदराव आणि प्रतिभावहिनी हिरवळीवर जातीने सगळीकडे काय पाहिजे म्हणून आस्थेने सर्वांची वास्तपुस्त करीत होते. चि. सौ. सुप्रियाही त्यांच्या जोडीला होत्याच. कय्यूम ड्रायव्हर मला दुसऱ्या दिवशी सांगत होता, की पाहुण्यांचे जेवण झाल्यावर साहेबांनी सर्व सिक्युरिटी स्टाफचे लोक, कर्मचारी, ड्रायव्हर्स अशा सर्वांना आधी जेवायला बसविले आणि त्यानंतरच ते उभयता जेवायला बसले. त्यावेळी रात्री दोनचा सुमार झाला असावा. अतिथ्यशीलतेचे ते मनोहारी दर्शन होते. ' " वाचनाबरोबर हळूहळू रावसाहेब साहित्यिक गोतावळ्यात रमू लागले. राजकारणातील, सहकारातील वा वकिली व्यवसायातील सहकाऱ्यांपेक्षा ही साहित्यिक मंडळी वेगळी होती व हे वेगळेपण रावसाहेबांना आवडू लागले. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे मित्र जोडले जाऊ लागले. त्यातून हे साहित्यिक वर्तुळ विस्तारत गेले. व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील या तिघांच्या कथाकथनाचा कार्यक्रम त्यावेळी महाराष्ट्रात खूप गाजत होता. त्यांचे अनेक कार्यक्रम रावसाहेबांनी श्रीरामपूर परिसरात घडवून आणले. एकदा तर श्रीरामपूर, कोपरगाव व नेवासा या तीन गावांमध्ये मिळून कथाकथनाचे सलग दहा कार्यक्रम रावसाहेबांनी आयोजित केले होते. विशेष म्हणजे या सर्व दहा कार्यक्रमांमध्ये ग. दि. माडगूळकरदेखील खूप उत्साहाने सहभागी झाले होते; एरवी कधी गदिमा कथाकथनात भाग घेत नसत. राजाभाऊ मंगळवेढेकरदेखील या दौ-यात सहभागी झाले होते. साहित्यिकांचे स्नेहसंमेलनच भरले असावे असे सगळे वातावरण होते. हा सगळा टीव्ही सुरू व्हायच्या आधीचा काळ. हित्यिकांभोवती त्या काळात एकप्रकारचे तेजोवलयच असायचे. विशेषत: ग्रामीण भागातील नवशिक्षित वर्गात 'कवि तो दिसे कसा आननी' हे जाणण्याचे लोकांमध्ये खूप कुतूहल होते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून ग्रामीण भागात प्रथमच साहित्यिक वातावरण होत होते. ही एक प्रकारची साहित्यिक चळवळच होती. राजाभाऊंनी लिहिलेल्या प्रेषितांच्या कथा या पुस्तकाचे प्रकाशन याच दौऱ्यादरम्यान गदिमांच्या हस्ते व रावसाहेबांच्या अध्यक्षतेखाली झाले. हा कार्यक्रम अशोकनगर येथे झाला. तेथील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि स्थानिक खासदार यांनी सर्व नियोजन केले होते. या दौऱ्यात सलग दहा दिवस रावसाहेब आणि गदिमा एकत्रच होते. गदिमांचा मुक्कामही रावसाहेबांच्या घरीच अजुनी चालतोची वाट... ३८२