पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गप्पांची मैफल रंगली. शशिकलाला ते म्हणाले, 'वहिनी, माझं एक स्वप्न आहे. मी ग्रंथालयात काम करतोय. ग्रंथालय बंद होण्याची वेळ होऊन जाते. काम आटोपता आटोपताच मी खुर्चीत बसून टेबलावर डोके टेकतो. बराच वेळ झाला तरी मी बाहेर येत नाही हे पाहून ग्रंथालयाचे दरवाजे बंद करणारा माणूस माझ्या ऑफिसचं दार उघडून आत येतो. मी झोपलो या समजुतीने मला हाका मारतो. प्रतिसाद मिळत नाही. अखेरीस मला हलवून पाहतो तर काय ? मी कायमचाच झोपलेलो! ग्रंथालयाचं काम करता करताच मी जगाला राम राम करतो. हेच माझं स्वप्न !' हा प्रसंग आठवतो व आमचे अंतःकरण गलबलून जाते! हरिभाऊंच्या फोटोचे अनावरण अण्णासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते ग्रंथालयात करण्यात आले. त्यांच्या त्या प्रतिमेकडे पाहून वाटते, मरणानंतरसुद्धा हरिभाऊ काही ग्रंथांची संगत सोडायला तयार नाहीत. त्यांना हाच स्वर्ग अभिप्रेत होता. " भावलेली माणसं या पुस्तकात श्री. शरद पवार यांच्यावरही एक लेख आहे. त्यातील एक साहित्यविषयक आठवण अशी आहे : "विद्या प्रतिष्ठान, बारामती यांच्या सभागृहाचे 'ग. दि. माडगूळकर सभागृह' असे नामकरण २० डिसेंबर २००३ रोजी करण्यात आले. नामदार शरदराव पवार यांच्या निमंत्रणानुसार आम्ही उभयता त्या सोहळ्याला उपस्थित होतो. श्री. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी पवार यांचे भाषण झाले. गदिमांच्या सर्व तऱ्हेच्या काव्यप्रकारांना कवेत घेणारे ते भाष्य होते. अस्खलितपणे सुमारे पस्तीस मिनिटे ते उत्स्फूर्त बोलले. लिहिलेले भाषण वाचणे हा तो प्रकार नव्हता. शिवाजीराव भोसले यांनीदेखील ह्या भाषणाची मनसोक्त प्रशंसा केली. 'राजकारणी शरदराव साहित्यावर इतके उत्तम बोलू शकतात हे मी आज प्रथम अनुभवतो आहे,' उद्गार त्यांनी काढले. तथाकथित प्रस्थापित साहित्यसृष्टीने ग. दि. माडगूळकरांची केवळ 'सिनेमाची गाणी लिहिणारा गीतकार' म्हणून एक प्रकारे अवहेलना केली. गदिमा जाऊन सुमारे पंचवीस वर्षांच्यावर कालावधी झाला. त्यांचे उचित स्मारक सरकारी आणि साहित्यक्षेत्रात होणे नितांत गरजेचे होते. तथापि तसे भरीव स्वरूपाचे काही झाल्याचे कोठे दिसून आले नाही. या शब्दप्रभूचा उचित गौरव शरदराव यांनी भव्य असे 'गदिमा सभागृह' उभारून केला. गदिमांच्या गीतांचा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा सांस्कृतिक कार्यक्रम खुल्या मंचावर संपन्न झाला. स्वत: शरदराव पवार दुसऱ्या तिसऱ्या रांगेत बसलेले; पण आमच्यासारख्यांना ते आवर्जून पुढे बसवीत होते. त्यांचा हा विनम्र भाव सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. कार्यक्रमानंतर साहित्यशारदेच्या प्रांगणात... ३८१