पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मधल्या चळवळीच्या व वकिलीतील उमेदवारीच्या काही वर्षांत खंड पडलेले रावसाहेबांचे वाचन वकिली व्यवसायात स्थैर्य येऊ लागल्यावर पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले. त्यासाठी श्रीरामपूर येथील नगरपरिषदेच्या ग्रंथालयाचे हरिभाऊ कुलकर्णी यांच्याशी जुळलेली तीस-एक वर्षांची मैत्री मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली. भावलेली माणसं या व्यक्तिचित्रसंग्रहामध्ये रावसाहेबांनी हरीभाऊंचे व्यक्तिचित्र खूप भरभरून रेखाटलं आहे. त्यातून हरीभाऊ उभे राहतातच; पण रावसाहेबांच्या लेखनशैलीचाही तो एक उत्तम नमुना आहे. '... आणि ग्रंथ पोरके झाले' या शीर्षकाखाली रावसाहेब लिहितात : "निखळ मैत्रीला निर्मळ अंत:करण लागते. हरीभाऊ असे निर्मळ अंत:करण जन्मतःच बरोबर घेऊन आले होते. जेमतेम कशीतरी दहावीपर्यंत त्यांनी मजल मारली; अत्यंत गरिबीमुळे ते शिक्षणाला वंचित झाले. तथापि औपचारिक पदवी धारण करणाऱ्यांपेक्षा हरीभाऊंचा व्यासंग कितीतरी मोठा होता. ज्ञान वर्धिष्णू असते. ज्ञानाच्या नवनवीन प्रवाहांशी सतत संपर्क ठेवावा लागतो. त्यासाठी ज्ञानसाधना करावी लागते. ही ज्ञानसाधना ग्रंथांच्या साहाय्याने उत्तम तऱ्हेने होऊ शकते. अशी ज्ञानसाधना हरिभाऊंनी जीव ओतून केली. ते ग्रंथमयच होऊन गेले. स्वत:चीच ज्ञानसाधना करून ते थांबले नाहीत, तर इतरांनादेखील त्याचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी ज्ञानप्रसारकाचे कामही मिशनरी वृत्तीने व उत्साहाने केले. श्रीरामपुरात त्यांनी वाचनसंस्कृती जागवली आणि जोपासली. अनेकांना त्यांनी वाचनाची गोडी लावली. वाचकांचे ते शिक्षकच झाले. त्यांच्या या विषयाचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्यामुळे कितीतरी पुस्तकांचे माझे वाचन झाले. एका कोळीयाने, डॉ. आयडा स्कडर, मानवेंद्रनाथ रॉय यांचे नवमानवतावाद, लोकशाहीचा जनक थॉमस जेफर्सन इत्यादी कितीतरी पुस्तके हरीभाऊंनी मला आवर्जून स्वतः वाचनासाठी आणून दिली. विशेष म्हणजे यांतील बहुतेक पुस्तके त्यांची स्वतःची होती. असा हा वाचनावर आणि वाचकांवर प्रेम करणारा ग्रंथवेडा ग्रंथपाल होता. एक जपानी हायकू आहे, 'झाडा, झाडा मला ईश्वराविषयी सांग, आणि ते झाड बहरून आले,' तसे पुस्तकांचा विषय काढला की हरीभाऊ बहरून जायचे; पुस्तकांविषयी किती बोलू असे होऊन जायचे. असेच एकदा मी एक होता कार्व्हर या पुस्तकावर साहित्य परिषदेत बोललो. तेव्हाही हरीभाऊंनी माझे मनसोक्त कौतुक केले. हरीभाऊ गेले आणि अशा जिव्हाळ्याच्या कौतुकाला मी पारखा झालो. हरिभाऊ एक दिवस आमच्या घरी आले. नित्याप्रमाणे चहा - फराळाबरोबर अजुनी चालतोची वाट... ३८०